ठाणे : श्रींचे आगमन दोन दिवसांवर आले असताना ठाणे महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवानगी देताना दरवर्षीपेक्षा यंदा जास्तच दिरंगाई केल्याची नाराजी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने व्यक्त केली. शनिवारी गणरायाचे आगमन होणार आहे. असे असताना बुधवारी १६० पैकी केवळ ४० मंडळांना परवानगी दिली असून १२० मंडळांना गुरुवारी परवानगी देणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.जून महिन्यापासून ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीने परवानगीसाठी आॅनलाइन यंत्रणा राबविण्यापेक्षा आॅफलाइन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली होती. परंतु, महापालिका आॅनलाइनवरच ठाम राहिल्याने मंडळांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. आॅनलाइन यंत्रणा सुरू झाल्यावर लगेचच मंडळांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. दरवर्षी आठ दिवस आधी मंडपाची परवानगी दिली जाते. ती देताना महापालिका नेहमीच उशीर करते. यंदा मात्र त्याहीपेक्षा जास्त उशीर करून ठाणे महापालिका स्वत:चेच घोडे दामटत असल्याचा आरोप ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी केला.>अर्ज आॅनलाइन अन् शुल्कवसुली मात्र आॅफलाइनठाणे महापालिकेकडून आॅनलाइन अर्ज स्वीकारला जात आहे. परंतु, पैसे मात्र आॅफलाइन घेतले जात आहे. तसेच, मंडळांनी आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत दिली होती. आॅनलाइन यंत्रणा यशस्वी होणार नाही, हे महापालिकेला सांगितले होते. मंडळांशी कोणतीही चर्चा न करता निर्णय घेतल्याचा हा परिणाम आहे. वेळीच मंडळांशी सुसंवाद साधला असता, तर ही वेळ आली नसती. यासाठी पालिकेशी तीन महिने पत्रव्यवहार करीत होतो, असे ते म्हणाले. मंडळांची एकीकडे परवानगीसाठी धावपळ, दुसरीकडे मूर्तीच्या आगमनाची तयारी यामुळे त्यांचा गोंधळ उडाला आहे. मनपाने परवानगी देण्यास दिरंगाई केल्याने पुढील सर्व तयारी रखडली आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करत काम करावे लागणार असल्याचे मंडळांनी सांगितले.>१६० गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४० जणांना मंडपाची परवानगी देण्यात आली असून उर्वरित १२० मंडळांना गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत परवानगी दिली जाणार आहे. उर्वरित मंडळांचे एनओसी बाकी आहे. परवानगी देताना महापालिकेने कोणतीही अडवणूक केली नाही. मंडळांनी कागदांची पूर्तता केली नाही.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका
ठाण्यात १२० मंडळे मंडप परवानगीच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 1:02 AM