ठाणे - ठाणे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व त्यांची नियमित उपस्थिती असावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला सहा महिन्यासाठी 1200 रुपये प्रोत्सानपर उपस्थिती भत्ता दिला जाणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर नरेश म्हस्के, आयुक्त डॉ. विपिन शर्मा व शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभर शाळा संपूर्णपणे बंद आहेत. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण मागील वर्षीपासूनच सुरू आहे. महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल घटकातील आहेत, या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ते शिक्षणापासून दूर जावू नयेत, कारण हेच विद्यार्थी भविष्यातील देशाचे आधारस्तंभ असल्याने ते शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.
सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा आढावा घेण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मनिष जोशी, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, गट अधिकारी संगीता बामणे व अस्लम कुंगले आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सर्वंकष अशी चर्चा करण्यात आली. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सहा महिन्यासाठी 1200 रुपये प्रोत्साहनपर उपस्थिती भत्ता हा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे, परंतु यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने महिन्यातील 20 दिवस उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जर एखादा विद्यार्थी 20 दिवसांमधील काही दिवस अनुपस्थित राहिला तर पुढील महिन्यात त्या विद्यार्थ्यांचा भत्ता दिला जाणार नाही. तसेच एका शिक्षकाला 20 विद्यार्थ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात करण्याबाबतही या बैठकीत ठरविण्यात आले. महापालिका शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे गरीब आहेत, या विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड असते परंतु ऑनलाईन शिक्षणासाठी ते उपस्थित राहत नाही , त्यांनी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घ्यावे, तसेच शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव मंदावला असून त्यांना लिखाणचा सराव रहावा यासाठी या विद्यार्थ्यांना नियमित सरावासाठी स्वाध्यायाचे वाटप केले जाणार असल्याचेही महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.