डोंबिवली: रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, अनेकदा प्रवासी अलार्म चेन पुलिंगचा वापर स्थानकात उशीरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे/ चढणे इत्यादी कारणांसाठी करत असल्याचेही दिसून आले आहे. यात एप्रिल ते जुलाई या चार महिन्यांच्या कालावधीत अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराची १२३० प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी सुमारे ११४३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७.५९ लाख- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंगच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या वेळापत्रकावरच परिणाम होत नाही तर त्या ट्रेनच्या मागून चालणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरी गाड्या उशिराने चालतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. तसेच एखाद्या किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.
अशा अवास्तव अलार्म चेन पुलींग घटनांवर मध्य रेल्वे बारीक लक्ष ठेवून आहे. यात एप्रिल ते जुलाई २०२२ या कालावधीत अलार्म चेन पुलींगच्या गैरवापराची १२३० प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी सुमारे ११४३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७.५९ लाख- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान प्रवाशांनी अनावश्यक / गैरवाजवी कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा वापर करू नये ज्यामुळे उर्वरित प्रवाशांची गैरसोय होईल. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलींग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. प्रवाशांनी त्यांच्या संबंधित गाड्या सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्टेशनवर पोहोचण्याचे आवाहनही रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.