ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कलयाण आणि भिवंडी या तिन्ही लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १२४ उमेदवारांनी आज शेवटच्या दिवसापर्यंत मातब्बर राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाच दिवसांचा अवधी देण्यात आला होता. या दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी ४ मे राेजी हाेणार आहे. त्यात आता किती जणांचे अर्ज बाद हाेणार याकडे राजकीय दिग्गजांसह जिल्ह्यातील जाणकारांचे लक्ष लागून आहे.
शेवटच्या दिवसापर्यंत ठाणे लाेकसभेसाठी ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. तर कल्याण लाेकसभेसाठी ३४ आणि भिवंडीसाठी ४७ उमेदवारी अर्ज आदी मिळून एकूण १२४ जणांनी उमेदवारी आजपर्यंत दाखल केली आहेत. यामध्ये राजकीय उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांची भाऊगर्दी ही माेठ्याप्रमाणात झालेली दिसून येत आहे. शनिवारी छाननी असून यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांची उमेदवारी ६ मेराेजी मागे घेण्याची संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रत्येक लाेकसभेत किती उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिल्याचे निश्चित हाेईल. त्यानंतर मात्र प्रचाराची रणधुमाळी सुरू हाेईल आणि राजकीय दिग्गजांचे आंदाजही ऐकायला मिळतील.