ठाणे : ठाणे वाहतूक पोलिसांनी दुचाकीस बसविलेल्या कर्णकर्कश सायलेन्सवर कारवाई करून जवळजवळ १२०० सायलेन्सर नष्ट केले आहेत. परंतु ही कारवाई करीत असताना तब्बल २९३ गॅरेजवरदेखील वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढेही जाऊन या गॅरेजवर कारवाई करीत असतानाच १२५ अनधिकृत गॅरेजचा शोधही लागला आहे. त्यामुळे अशा गॅरेजवर तोडक कारवाई करण्यासंदर्भातील पत्र ठाणे वाहतूक विभागाने पोलीस आयुक्तालयातील सर्व महापालिकांना दिले आहे.
दुचाकीमध्ये मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसविण्याचे प्रकार मागील काही वर्षांत वाढताना दिसून आले आहेत. अशा सायलेन्सरच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांविरोधात मोहीम हाती घेली आहे. १५ जूनपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेत वाहतूक पोलिसांनी १ हजार ३८८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. याशिवाय एक हजार १९१ दुचाकींचे सायलेन्सर काढून ते बुलडोजरच्या साहाय्याने नष्ट केले आहेत.
दरम्यान, ठाणे पोलीस आयुक्तालयात म्हणजेच ठाणे ते बदलापूर या भागात अशा वाहनांवर कारवाई करताना अशास्वरुपाचे कर्णकर्कश सायलेन्सवर बनविणाऱ्या २९३ गॅरेजवर कारवाई केली आहे. त्यानुसार अशा गॅरेजवाल्यांवर एक हजार रुपये दंडाची वसुली केली आहे. तसेच यापुढे त्यांनी अशाप्रकारचे सायलेन्सर बनवून विकू नये, अशी ताकीदही त्यांना दिली आहे. दुसरीकडे या २९३ पैकी १२५ दुकाने बेकायदा असल्याची बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यातील विविध पालिकांना दिले आहे. त्यात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ पालिकांचा समावेश आहे. आता या पालिका गॅरेजवर कारवाई करणार का? हे पाहणो महत्त्वाचे ठरणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक अनधिकृत गॅरेज असून, ही संख्या ५२ एवढी आहे. त्यानुसार ठाण्यातील वागळे इस्टेट २९, कापूरबावडी ५, कासारवडवली ६, मुंब्रा ६, राबोडी ६ अशी विविध भागात ही अनधिकृत गॅरेज आहेत.
महापालिका- अनधिकृत गॅरेज संख्या
ठाणे - ५२
उल्हासनगर - ३६
भिवंडी - २४
कल्याण-डोंबिवली - १०
अंबरनाथ - ३