लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी शिक्षकांसह स्वच्छता निरीक्षक, शिपाई यांची बदली केली. तसेच तब्बल १२५० सफाई कामगारांच्या बदलीचे आदेश देत इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीचे संकेत दिले. भाजपाचे वरिष्ठ नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना चाकूचा धाक दाखवून कंत्राटदाराने स्थायी समिती कार्याल्यात मारहाण केली. शिक्षण मंडळातील निविदा व कंत्राट घेण्यावरून मारहाण झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. याप्रकाराने पालिकेत एकच खळबळ उडाली. आयुक्त शिंदे यांनी शिक्षण मंडळाच्या कारभाराची दखल घेत चौकशी केली. तेव्हा मंडळाच्या कारभारातील सावळागोंधळ पुढे आला. त्यांनी सरसकट सर्वच शिक्षकांच्या बदल्या करून, शिक्षण मंडळाचे कार्यालय दुसऱ्याच दिवशी पालिका मुख्यालयात हलविले. आयुक्तांनी शिपाई व स्वच्छता निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्या पाठोपाठ त्यांनी तब्बल १२५० सफाई कामगारांच्या बदलीचे आदेश काढले. तसेच प्रभाग समिती कार्यालयातील कर्मचारी, मुकादम, बीट निरीक्षक यांच्या बदलीचे संकेत दिले.दरम्यान, शिक्षकांच्या बदल्या केल्या तेव्हा आयुक्त शिंदे यांनी कुणीही राजकीय वशिला आणू नये अशी सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे शिक्षकांना दुसऱ्याच दिवशी बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागले होते.
१२५० सफाई कामगारांच्या बदल्या
By admin | Published: May 23, 2017 1:35 AM