उल्हासनगर - महापालिका आयुक्त व कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर १२ हजार ५०० दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. कोरोना काळात कामगारांनी दिवस रात्र सेवा देऊनही गेल्यावर्षी पेक्षा कमी बोनस दिल्या प्रकरणी शिवसेना, भाजप यांनी नाराजी व्यक्त करून आयुक्तां सोबत पुन्हा चर्चा करण्याचे संकेत भाजपचे नगरसेवक मनोज लासी यांनी दिले आहे.उल्हासनगर महापालिका कामगार संघटनेचे नेते चरणसिंग टाक, राधाकृष्ण साठे, दिलीप थोरात, दीपक दाभाने आदींनी कर्मचारी दिवाळी बोनस बाबत महापौर लिलाबाई अशान, आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपमाहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती विजय पाटील, सभागृह नेते भरत गंगोत्री, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त मदन सोंडे, विकास चव्हान यांच्या सोबत गुरुवारी दुपारी ३ वाजता चर्चा केली. कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी कोरोना काळात चांगले काम केल्याचे सांगून २० हजार दिवाळी बोनसची मागणी केली. मात्र आयुक्तांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याचे सांगून बोनस १२ हजार ५०० यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संघटनेच्या नेत्यांनी गेल्या वर्षी दिलेला १५ हजार रुपये, तरी बोनस द्या. अशी मागणी लावून धरली होती. मात्र महापालिका प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.महापालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात चांगले काम केल्यानेच कोरोना रुग्णावर नियंत्रण मिळविले. अशी प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी देऊन दिवाळी बोनस कमी दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. महापालिकेवर शिवसेना आघाडीची सत्ता असून थेट शिवसेना शहरप्रमुख चौधरी यांनी नाराजी व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चौधरी यांच्या पाठोपाठ ओमी टीम व भाजपने नाराजीचा सूर आवळला आहे. कोरोना काळात सफाई कामगारांनी काम केल्याने कोरोना प्रोत्साहन भत्त्यासह दिवाळी बोनस वाढीव द्यावा. त्यासाठी भाजपाचे गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी आयुक्तांना पत्र देऊन बैठक बोलविल्याची माहिती नगरसेवक मनोज लासी यांनी दिली. महापालिकेवर बोनसच्या रूपाने ४ कोटी ५० लाखाचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांनी माहिती दिली.चौकटदिव्यागांना अनुदानमहापालिकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याने शहरातील नोंदणीकृत ८०० दिव्यागाना अनुदान देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दिवाळीत दोन टप्यात अनुदान देणार असल्याचे संकेत उपायुक्त विकास चव्हाण यांनी दिले.
उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० दिवाळी बोनस, भाजप, शिवसेना मात्र नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 3:15 PM