लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील आयरे गावातील युवा सेनेचे पदाधिकारी विक्रांत केणे यांची मंगळवारी गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी मंगेश भगत याच्यासह १३ जणांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, स्थानिक पोलिसांच्या तपासावर विश्वास नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी विक्रांत यांचा भाऊ सचिन केणे यांनी केली आहे. यासंदर्भात गुरुवारी ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मंगळवारी उभ्या केलेल्या गाड्या बाजूला घेण्यावरून झालेल्या वादात हत्या झाली. या प्रकरणी विक्रांत यांचा भाऊ सचिन केणे यांच्या फिर्यादीवरून श्रीराम भगत, मंगेश भगत, ओम्कार भगत, पंकज म्हात्रे, सुमीत चौधरी उर्फ लाडू, प्रदीप नायडू, संजय तुळवे, स्वप्निल चौधरी, प्रशांत पवार, शशी, सुमितची आई आणि अन्य एक महिला अशा १३ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.विक्रांत यांच्या मारेकऱ्यांना शोधासाठी पाच पथके तयार करू न टिटवाळा, कर्जत, ठाणे, मुंबई आदी ठिकाणी रवाना केली आहेत. तसेच या हत्येचे सीसीटीव्ही फूटेज मिळविण्याचाही आमचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करू, असे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी सांगितले.दरम्यान, आरोपींची नावे आणि गाडीनंबर माहीत असूनही रामनगर पोलिसांनी त्यांना २४ तास उलटूनही अटक केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. १८८ परवानाधारकांची होणार चौकशी डोंबिवली शहरात मे महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या तीन घटनांमध्ये परवानाधारी शस्त्रांचा गैरवापर करण्यात आल्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी कल्याण परिमंडळ-३च्या आठही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शस्त्र परवाने दिलेल्या व्यक्तींची पुन्हा तपासणी करून त्याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना मंगळवारी दिले आहेत.
विक्रांत केणे हत्येप्रकरणी १३ जणांवर गुन्हा
By admin | Published: June 01, 2017 3:36 AM