कल्याण : कोरोनामुळे चाकरमानी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच कोकणात नैसर्गिक आपत्ती ओढावली. मुंबई उपनगरातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता यावे यासाठी शिवसेनेने महाड ते सावंतवाडीदरम्यान २०० बस सोडल्या. त्यातील १३ बस डोंबिवलीतून सोडल्या असून, त्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखविला.
याप्रसंगी माजी महापौर विनीता राणे, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, जयेश म्हात्रे आदी उपस्थित होते. डोंबिवलीतून १६ बस रवाना झाल्या. कोकणात जाण्यासाठी प्रति व्यक्ती किमान ७०० ते ८०० रुपये खर्च येतो. कोरोनामुळे आर्थिक स्थिती ठीक नसलेल्या चाकरमान्यांना शिवसेनेने मोफत बस उपलब्ध करून दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला.
डॉ. शिंदे यांनी या बस उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणतेही संकट असो जनतेच्या पाठीशी शिवसेना कायम भक्कमपणे उभी असते, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, दिवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण येथून या बस बुधवारी सायंकाळी सोडण्यात आल्या. डोंबिवलीतून बुधवारी महाड, मंडणगड, दापोली, श्रीवर्धन, खेड, चिपळूण, सावंतवाडी, देवगड अशा १३ मार्गांवर बस रवाना झाल्या.
--------------------