ठाणे : ठाणे शहरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १३ गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये ९ गोंविदांना कळवा रुग्णालयात तर चार गोविंदांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. यामध्ये एका महिला गोंविदाचा समावेश असून त्या महिला गोविंदाच्या मणक्याला दुखापत झाल्याने, नातेवाईकांनी तातडीने मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलविले आहे. तर एक गोविंदाचा हात फॅक्चर झाला असून उर्वरित सर्व जण किरकोळ जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या सर्वांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
ठाणे शहरात दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदा पथकांचे अपघात होऊन १३ गोविंदा दुखापत झाली. यामध्ये कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलेल्यांमध्ये अनिकेत अनिल मेंढकर (रा.चिराग नगर, ठाणे.) अक्षय कडू (२५) मुलुंड पूर्व येथील नरेंद्र धामनराव वाल्मिक, दिव्यातील पीयूष पी. लाला (१८ ), सोमनाथ सुभाष सूर्यवंशी (२७), केदार पवार (२८) ,गौरव विष्णू चौधरी (२०) ,कल्याणचा चैतन्य हेमंत ढोबळे (२१) , दिघा येथील आकाश जयचंत चव्हाण (२०) या ९ जणांसह कांजूर मार्ग येथील अनिकेत खोडे (२१) , जोगेश्वरी येथील अर्चना खैरमार (३७) आणि गोरेगाव येथील राहुल केदारे (२९) तसेच विरार येथील पृथ्वी पांचाळ अशी १३ जखमी गोविंदांची नावे आहेत.