ठाणे : कचऱ्याच्या विल्हेवाटीवरून स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे महाननगरपालिकेची घसरण झाली असताना, ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मार्च २०२१ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. यातून रोज १३ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या ठिकाणी स्थानिक दोन हजार नागरिकांना रोजगार निर्माण होणार असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.
ठाणे शहरात सुमारे ९६३ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यामध्ये ५१५ मेट्रिक टन ओला कचरा, ४४१ मेट्रिक टन सुका आणि १२५ मेट्रिक टन सीएनडी वेस्ट (डेब्रिज) चा समावेश आहे. त्यानुसार, सीएनडी वेस्टचा प्रकल्प सुरूझाला. पनवेल, भिवंडी आदी महापालिकांनीदेखील यासाठी ठामपाकडे संपर्क साधला आहे. परंतु, ठामपा स्थापन झाल्यापासून डम्पिंगचा प्रश्न सुटलेला नाही.
१२ वर्षांपूर्वी डायघर येथे पालिकेने कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु, स्थानिकांचा विरोध झाल्याने तो अर्ध्यावरच गुंडाळावा लागला. त्यानंतर, कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न पुढे आला. त्यानुसार कधी गायमुख, कधी खर्डी, कधी वागळे असा प्रवास करीत सध्या दिवा भागात कचरा टाकला जात आहे.
आता शीळ येथील वनविभागाची जागाही पालिकेच्या ताब्यात असून तीवर कचरा टाकण्यास वनविभागाने हिरवा कंदील दिला आहे. या ठिकाणी १०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. यावर तोडगा निघावा म्हणून पालिकेने तळोजा येथील सामूहिक भरावभूमीमध्येही सहभाग घेण्याचे निश्चित केले होते.
परंतु, एमएमआरडीएकडून आलेले दर आणि पालिकेने दिलेले दर यावरून ठामपाने या प्रकल्पातून माघार घेतली होती. त्यानंतर पुन्हा शहरात कचºयाचा प्रश्न डोके वर काढू लागल्याने महापालिकेने पुन्हा या योजनेत सहभागी होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु,आता ही योजनाच बारगळल्याने पालिकेला कचरा टाकायचा कुठे, असा पेचपडला आहे.
स्थानिकांचा विरोध मावळला
स्थानिकांचा विरोध मावळला असून त्यानुसार आता येथे आजूबाजूला वृक्षलागवड आणि इतर कामे सुरूकेली आहेत. तसेच संरक्षक भिंतीचेही काम पूर्ण झाले आहे. एकूणच प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होणार असून ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन, त्यानंतर प्रत्यक्षात प्रकल्पउभारणीला लवकरच सुरुवात होईल, अशी आशा महापालिकेने व्यक्त केली आहे.
दुर्गंधी टाळण्यासाठी निगेटिव्ह प्रेशर प्रणाली
पालिकेने दीड वर्षांपूर्वी डायघर येथे कचºयावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी बंदिस्त पद्धतीने कचºयावर प्रक्रिया केली जाणार असून त्याची दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून निगेटिव्ह प्रेशर प्रणालीचा वापर करण्याबरोबरच कचºयापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प खाजगी कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.
येथे रोज १३ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यानुसार, एका कंपनीला काम देण्यात आले असून त्यांच्याकडूनदेखील वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. १८ महिन्यांत हा प्रकल्प उभारायचा असून त्यातील सुमारे आठ महिने विविध प्रक्रिया आणि संमंती मिळविण्यात गेले आहेत. त्यानंतर, आता वर्ष उलटत आले आहे. असे असले तरी आता खºया अर्थाने येथील प्रकल्प मार्गी लागले, असा दावा पालिकेने केला आहे.