ठाणे : ठाणे जिल्ह्यात मे महिन्याच्या पंधरवाड्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली घट पाहता जिल्ह्यातील सहा महापालिका दोन नगरपालिका व ग्रामीण क्षेत्र मिळून १७ हजार २६७ इतके बेडपैकी १३ हजार ३५७ बेड रिक्त आहेत. रिक्त बेड्सची टक्केवारी ही ८० टक्केच्या घरात गेली आहे. त्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने देखील आणखी बेड्सची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
पूर्वी दिवसाला २०० ते ३०० च्या घरात असलेली रुग्णसंख्या थेट दीड हजार ते दोन हजाराच्या घरात पोहोचली. दिवसेंदिवस ती कमी होण्याची कोणतीच चिन्हे दिसून येत नाही. तसेच या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभारलेले कोविड केअर सेंटरसह खासगी कोविड रुग्णालये देखील हाऊसफुल्ल होऊ लागली आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड्ससाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यात ऑक्सिजन बेड्स मिळणे कठीण होऊन बसले होते. अचानकपणे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेवर देखील अतिरिक्त ताण आला होता. या कालावधीत ऑक्सिजनसह कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचा देखील तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे इंजेक्शन आणि रुग्णालयात बेड्स मिळावे यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यात रुग्णांच्या संख्येत घट होत असून बघता बघता दीड ते तीन हजाराच्या घरात असलेली रुग्णसंख्या पाचशेच्या आत आली आहे. दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत आहे.
ठाणे जिल्ह्यातील पाच लाख २० हजार ८१० कोरोना बाधितांपैकी पाच लाख पाच हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत नऊ हजार ५५२ जणांचा या आजाराने मृत्यू झाला असून सध्या सहा हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका व ग्रामीण क्षेत्र मिळून १७ हजार २६७ इतके बेडपैकी १३ हजार ३५७ बेड रिक्त आहेत. सध्याच्या घडीला अवघ्या तीन हजार ९१० इतक्या बेड्सवर रुग्ण उपचार घेत आहे.