भिवंडी : महानगरपालिकेच्या कामगारांना १३ हजार ५०० रुपये अनुदान पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सोमवारी घोषित केले. कामगार प्रतिनिधी व आयुक्त यांच्यामध्ये आयुक्त दालनात झालेल्या बैठकी नंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीस भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद पाटील, कामगार कर्मचारी कृती संघटनेचे घनश्याम गायकवाड, महेंद्र कुंभारे, राजेश जाधव, गौतम शेलार, प्रकाश पाटील, प्रदीप शिर्के, राजेंद्र काबाडी, दीपक राव आदी कामगार कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत आयुक्तांनी १३ हजार ५०० रुपयांच्या अनुदानाला मान्यता दिली. यातील बारा हजार रुपये ही दिवाळी सणापूर्वी व उर्वरित पंधराशे रुपये ही पुढील महिन्यात रोख रक्कम ज्या प्रमाणे उपलब्ध असेल त्यानुसार देण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली. दरम्यान महापालिकेच्या बजेटमध्ये मनपा कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानसाठी सहा कोटींची तरतूद करण्यात आली असून, याप्रमाणे मनपा कर्मचाऱ्यांना १४ हजार २०० व दरवर्षाप्रमाणे १ हजार रुपये वाढीव असे १५ हजार २०० रुपये अनुदान देणे बंधनकारक असतानाही पालिका प्रशासनाने काही कामगार संघटनांना व आमदारांना हाताशी धरून कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मनपा प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात दोन दिवसात मनपा प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा लेबर फ्रंट युनियनचे अध्यक्ष एडवोकेट किरण चन्ने यांनी दिली आहे.