सुरेश लोखंडे , ठाणेपाऊस विलंबाने आलेला असतानाच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी भातासह नागली पिकांसाठी बँकेचे कर्ज घेतले आहे. यानुसार, ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे २६ हजार ७४६ शेतकऱ्यांना या खरीप हंगामासाठी १३० कोटी २३ लाख ६७ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केल्याचा दावाठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला आहे. भात व नागली या खरीप हंगामातील प्रमुख पिकांसह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे टीडीसीसी बँकेचे नियोजन आहे. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांत ऊस उत्पादक नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. सध्याच्या या खरीप हंगामात शेतकऱ्यांना या दोन्ही जिल्ह्यांतील ३८६ शेती संस्थांद्वारे १३० कोटी २३ लाख ६७ हजार रुपये पीककर्ज दिल्याचे टीडीसीसीचे मुख्य पीककर्जवाटप अधिकारी विलास पाटील यांनी सांगितले. भातासाठी हेक्टरी ५५ हजार तर नागलीसाठी हेक्टरी २५ हजार रुपयांप्रमाणे या कर्जाचे वाटप होत आहे. या कर्जाच्या मुद्दलाची रक्कम शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत भरणे अपेक्षित आहे. वर्षभराच्या या कालावधीत त्यांच्या कर्जावरील ७ टक्के व्याजदर शासनाकडून बँकेस मिळतो. ठाणे जिल्ह्यातील २०६ शेती संस्थांव्दारे १५ हजार ४८८ शेतकऱ्यांना कर्जवाटप झाले आहे. त्यांच्या १३ हजार ०७८.७५ हेक्टर क्षेत्रासाठी ६७ कोटी ७५ लाख ७६ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील १८० शेती संस्थांव्दारे ११ हजार ३७५ शेतकऱ्यांना त्यांच्या १३ हजार ६६७.२५ हेक्टर क्षेत्रासाठी ६२ कोटी ४७ लाख ९१ हजार रुपये कर्जाचे वाटप केले आहे.
शेतकऱ्यांना १३० कोटींच्या पीक कर्जाची मदत
By admin | Published: August 04, 2015 3:19 AM