बदलापूर : महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाची जोड मिळाल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. एखाद्या छोट्या उद्योग व्यवसायाची उभारणी होऊ शकते, या भावनेतून उर्मी फाउंडेशनने खास महिलांसाठी १५ दिवसीय कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. याचा १३० महिलांनी लाभ घेतला असून, यातून त्यांना आत्मनिर्भरतेचे बळ मिळणार आहे.
१५ दिवसांच्या या शिबिरात महिलांना वारली पेंटिंग, अगरबत्ती तयार करणे, साडी शिलाई, केक, चॉकलेट तयार करणे, मेहंदी तसेच ज्वेलरी मेकिंग, आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचा नुकतेच कै. नाईक विद्यालयात समारोप करण्यात आला. या निमित्ताने महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शनही आयोजिले होते. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रियांका दामले यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. महिलांना व्यवसाय रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आगामी काळातही आपण असे उपक्रम-कार्यक्रम राबविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाॅर्ड अध्यक्षा प्राची थिटे यांनी सांगितले. याप्रसंगी दत्ताराम थिटे, आनंद वाघमारे, सुदाम घुगे, जय खिच्ची, प्रीतम वाघमारे, नीलेश थिटे, जयश्री घुगे, आदी उपस्थित होते.
.........