ठाणे : ठाण्यात मागील काही दिवसापासून स्वाईन फ्लुच्या रुग्णात वाढ होत असल्याचे चित्र आहे. ९ जुलै पर्यंत स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या ७० च्या आसपास होती, आज तीच संख्या १३१ वर पोहचली आहे. या सर्व रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर डायरीयाच्या रुग्णांची संख्या १६० हून अधिक झाली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत सध्या स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. जुलै महिन्यात १० दिवसातच रुग्णांची संख्या ७० च्या पार गेली होती. तर जुन महिन्यात ८ रुग्ण आढळले होते. मात्र आता दिवसागणिक या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचेच दिसत आहे. सध्या पालिका हद्दीत स्वाईन फ्लुचे १३१ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता सर्तक झाला आहे. या सर्व रुग्णांवर खाजगी रुग्णालयातच उपचार घेतल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या कळवा रुग्णालयात सध्या एकही रुग्ण दाखल नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. पहिल्या १० दिवसात ७० रुग्ण असतांना पुढील चार दिवसात ही रुग्णसंख्या ६१ ने वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्वाईनचा फैलाव अधिक प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.
कळवा रुग्णालयात विशेष कक्षठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लुच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. याठिकाणी एकूण १९ बेड सज्ज असून त्यातील ४ बेड हे आयसीयुचे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच याच रुग्णालयात स्वाईप टेस्टींगची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
दुसरीकडे डायरीयाच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असून सध्या ही संख्या १६० वर पोहचली आहे. दुसरीकडे लेप्टोचे २०, टायफाईड ०७, मलेरिया -१७, डेंग्युचे संशयीत २१ आणि लागण झालेले ७ असे २८ रुग्ण आहेत.
वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खरबदारीच्या सुचना केल्या असून पाणी उकळून व गाळून प्यावे. तसेच स्वाईन फ्लुच्या दृष्टीने कळवा रुग्णालयात १९ खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला असून पुरेसा औषध साठा देखील उपलब्ध आहे.(डॉ. चेतना नितील - मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा)