ठाणे : होळीसाठी ठाणे विभागीय एसटी महामंडळाने यंदा तब्बल १३२ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे नियोजन येत्या २६ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान केले आहे. तसेच सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन बसनेच प्रवास करावा, असे आवाहनही केले आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयातील ठाणे १-२, कल्याण आणि विठ्ठलवाडी या डेपोंतून या १३२ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ठाणे-१ येथून ४७ आणि ठाणे-२ मधून ४५ गाड्या सोडणार आहेत. विठ्ठलवाडीतून २२ आणि कल्याणमधून १८ गाड्या सुटणार आहेत. ठाणे १-२ मध्ये वेगवेगळे ३० मार्ग निश्चित केले आहेत, तर विठ्ठलवाडीचे १३ आणि कल्याणातील ८ मार्ग आहेत. यासाठी एक महिना अगोदर बुकिंग सुरू झाले आहे. प्रवाशांच्या प्रवासाची तारीख निश्चित करून आगाऊ आरक्षण उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली, ठाणे, बोरिवली या महामंडळांकडून खाजगी एजंट आरक्षणासाठी नियुक्त केलेले आहेत. जादा गाड्यांचे मार्ग साखरपा, महाड, आंबवडे, दापोली, रत्नागिरी, दिवेआगार, चिपळूण, गुहागर, अलिबाग, कासे असे आहेत. याबाबत सविस्तर माहिती जवळील आगार व संगणकीय आरक्षण प्रणालीत उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले.
होळीसाठी एसटीच्या १३२ जादा गाड्या, ठाणे विभागीय कार्यालयाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 2:24 AM