लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महापालिका प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत पाणीबिलापोटी १३३ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षी ४ मार्चपर्यंत ११८.६५ कोटीची वसुली झाली होती. मात्र, यंदा कोरोना टाळेबंदीमुळे ऑगस्ट महिन्यापासून पाणी देयकांची वसुली सुरू झाली असली तरी ती गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.३५ कोटी अधिक झाली आहे. तर मार्च अखेरपर्यंत आयुक्तांनी प्रस्तावित केलेले १५० कोटींचे लक्ष पार करू, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.कोरोना रोखण्याच्या कामात महापालिकेची यंत्रणा व्यस्त होती. यामुळे जुलै महिना अखेरपर्यंत मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली होऊ शकली नव्हती. त्यामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दोन्ही करांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून प्रशासनाने कर वसुलीवर भर दिला. यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या नेतृत्वाखाली पथके कार्यरत केली. या मोहिमेत चालू आणि मागील वर्षांच्या पाणी देयकांची वसुली केली जात आहे. यात थकबाकी देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची नळजोडणी तोडली जात असून ४ मार्चपर्यंत ३ हजार ६९० नळजोडण्या तोडल्या आहेत. यामुळे आतापर्यंत एकूण १३३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. थकबाकीदारांसाठी व्याज १०० टक्के माफ केल्यामुळे या योजनेचा लाभ अनेक करदात्यांनी घेतला असून आतापर्यंत १६.९४ कोटींची वसुली झाली आहे. यामध्ये ६.२१ कोटी प्रशासकीय आकार माफ केला आहे.
नागरिकांची ऑनलाइन कर भरण्यास पसंतीमालमत्ता कराप्रमाणे ठाणेकरांनी पाणी बिलाची रक्कम ऑनलाईन भरण्यावर भर दिला आहे. ४ मार्चपर्यंत १०.८९ कोटींची वसुली केली आहे.
२५ कोटींनी उद्दिष्ट केले कमीमहापालिका क्षेत्रात एकूण दीड लाख घरगुती तर ६ हजार ५०० वाणिज्य नळ जोडणीधारक आहेत. पाणी देयकांच्या वसुलीपोटी अर्थसंकल्पामध्ये १७५ कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, ते कमी करून आता १५० कोटी केले आहे. गेल्यावर्षी १३३ कोटींची वसुली झाली होती. त्यामुळे येत्या मार्च अखेरपर्यंत १३३ कोटीं ऐवजी १५० कोटींचा आकडा गाठणे शक्य होईल, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.