मुंब्रा : येथील ठाकूरपाडा भागातील सम्राटनगर परिसरातील नाल्याच्या बाजूला असलेल्या तीन इमारतींच्या खालचा मातीचा भराव काही अंशी पाण्यात वाहून गेल्याचे सोमवारी रात्री निदर्शनास आले. यामुळे धोकादायक बनलेल्या या इमारती खबरदारी म्हणून रिकाम्या करण्यात आल्या असून, स्वस्तिक या नऊ मजली इमारतीमधील ६९ तसेच कोकणनगरी या पाच मजली इमारतीमधील ६३ आणि एक मजली जयराम भगत चाळीमधील सहा अशा एकूण १३८ कुटुंबांना महापालिकेच्या बाजारपेठेतील शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. भराव वाहून गेलेल्या खड्ड्यात पडल्यामुळे रोशन शेख (३३) हा तरुण किरकोळ जखमी झाला. दरम्यान, भराव वाहून गेलेल्या इमारतींना अधिक धोका पोहोचू नये यासाठी तिथे तातडीने काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेणार असल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सागर साळुंखे आणि कार्यकारी अभियंता धनजंय गोसावी यांनी ‘लोकमत’ला दिली.
मुंब्र्यातील तीन इमारतींमधील १३८ कुटुंबे स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:42 AM