कल्याण : केडीएमसीच्या मालमत्ताकर वसुलीस कोरोनामुळे फटका बसला आहे. एप्रिल ते आतापर्यंत मनपाने १३९ कोटी रुपये वसूल केले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वसुली २३ कोटींनी कमी आहे. मनपाला मालमत्ताकराच्या वसुलीचे ४३२ कोटींचे लक्ष्य गाठायचे आहे. मात्र, सध्याच्या काळात ते गाठण्याचे एक मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.केडीएमसीच्या उत्पन्नाची मदार ही मालमत्ताकर, पाणीपट्टी व विकासशुल्कावर अवलंबून आहे. मालमत्ताकर वसुली विभागाने सप्टेंबर २०१९ अखेर १६२ कोटींची वसुली केली होती. मात्र, यंदा मार्चपासून कोरोनाचा फटका बसल्याने त्या तुलनेत २३ कोटींनी वसुली कमी झाली आहे. वसुलीचा हा आकडा वाढवण्यात येणार आहे.मात्र, यंदाच्या सप्टेंबरची वसुली पाहता सप्टेंबर २०१९ च्या वसुलीपेक्षा चार कोटींनी वसुली पुढे आहे, असा दावा करवसुली विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी यांनी केला आहे.पुढील सहा महिन्यांत २९९ कोटींची वसुली करायची आहे. तरच, ४३२ कोटींचे वसुलीचे लक्ष्य गाठता येणे शक्य आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर, अनेकांना पगारकपातीचा फटका बसला आहे.त्यामुळे मालमत्ताकराच्या वसुलीसाठी तगादा लावू नये, करात सूट द्यावी, अशा मागण्या नगरसेवकांकडून होत आहेत. परिणामी, वसुलीचे लक्ष्य गाठणे प्रशासनाला कठीण होणार आहे.१८ गावे वगळल्याने २०० कोटींवर पाणी?केडीएमसी हद्दीतून १८ गावे वगळल्याने मनपाला मालमत्ताकरात मोठा फटका बसला आहे. या गावांतून या कराच्या थकबाकीपोटी किमान २०० कोटी रुपये येणे अपेक्षित होते. मात्र, आता ही थकबाकी वसुली बारगळली आहे.दुसरीकडे मनपाने कर न लावलेल्या जवळपास ८० हजार मालमत्तांचे सर्वेक्षण केले असून, त्या मालमत्तांकडून करापोटी उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे करवसुलीत भर पडू शकते, असा दावा अर्थसंकल्प सादर करताना स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी केला होता.प्रत्यक्ष वसूल होणाºया रकमेतून विकासकामे मंजूर होणार आहेत. सध्याच्या उत्पन्नातील बहुतांश रक्कम ही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावर खर्च केली जातआहे.
मालमत्ताकराच्या वसुलीतून १३९ कोटी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:14 AM