कर्जत : तालुक्यात येऊन साऊथ आफ्रिकेची पैसे दुप्पट करणारी कंपनी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक केल्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कर्जत येथे सेमिनार घेऊन १४ लोकांकडून तब्बल १ कोटी १९ लाख ५६ हजारांची रक्कम घेऊन बोगस कंपनीच्या संचालकांनी पोबारा केला आहे. रायगड पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला आहे.जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कर्जत तालुक्यात येऊन साऊथ आफ्रिकेच्या बोगस कंपनीच्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दापाश केला आहे. त्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांचा आधार घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील तीन तरुणांनी साऊथ आफ्रिकेत कंपनी असल्याचे भासवून त्या कंपनीची बनावट वेबसाइट तयार केली. पुण्याच्या गोकुळनगर भागातील सोनू सोपान वाडकर आणि हवेली मांजरी येथील महेश तुकाराम झगडे या दोघांनी प्रिन्स अग्रवाल या सॉफ्टवेअर इंजिनियर तरु णाला हाताशी धरले. तिघांनी www.parcypto.org ही वेबसाइट तयार करून घेतली. ही वेबसाइट साऊथ आफ्रिकेत असलेल्या कंपनीची असून, ती कंपनी एक वर्षात पैसे दुप्पट करते, असे सांगून त्या तिघांनी कर्जत येथील राज कॉटेज हॉटेलमध्ये गुंडगे भागातील अभय भीमा पवार (३२) यांच्याशी कंपनीबाबत ९ सप्टेंबर २०१६ रोजी प्रथम चर्चा केली. त्यानंतर आपल्या बनावट असलेल्या परदेशी कंपनीचे नाव वापरून अनेकांना आकर्षित केले. त्या कंपनीचे एक सेमिनार देखील कर्जतमध्ये पार पडले होते.पैसे दुप्पट होणार म्हणून त्या १४ लोकांनी १ कोटी १९ लाख ५६ हजार एवढी रक्कम साऊथ आफ्रिकेत कार्यालय असलेल्या कंपनीत गुंतवली. हा सर्व व्यवहार त्या तिघांनी जानेवारी २०१७ पर्यंत करताना सर्वांकडून चेकद्वारे रक्कम स्वीकारली होती. मात्र सप्टेंबर महिना आला तरी आपल्या खात्यात कंपनीने डबल झालेले पैसे जमा केले नाहीत म्हणून कर्जत गुंडगे येथील तरु ण अभय भीमा पवार हा कंपनीच्या त्या तिघा संचालकांना फोन करू लागला. त्यांचे कोणाचेही फोन लागत नसल्याने शेवटी पवार याने कर्जत पोलीस ठाणे गाठले. ८ नोव्हेंबर रोजी आर्थिक फसवणूक झालेली तक्र ार जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने दाखल करून तपास सुरू केला आहे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए. ए. जगदाळे तपास करत आहेत.
बनावट कंपनीद्वारे १४ जणांची फसवणूक, कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 1:13 AM