विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. तालुक्यातही ५४ बालकांच्या मृत्यूची नोंद आहे, तर अतितीव्र बालकांची नोंद डिसेंबरमध्ये १३७ आहे. या बालकांच्या उपचाराची जबाबदारी आरोग्य विभाग व अंगणवाडी यांची आहे. याची दखल घेऊन साम (अतितीव्र बालक) व माम (मध्यम तीव्र बालक) यांच्या यांच्या उपचाराकरीता तसेच महाराष्ट्र राज्याचा अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगाच्या मंजूर सुधारित कृती आराखड्यानुसार तालुकास्तरीय बालउपचार केंद्र (सीटीसी) स्थापन करण्यासाठी अनुदान मंजूर झाले असून गंभीर कुपोषित (साम) बालकांना दाखल करू न त्यांची काळजी घेण्यात येणार आहे. हे बालउपचार केंद्र विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आले असून या केंद्रात १० बालक उपचार घेणार असून सद्य:स्थितीत ६ बालकांवर उपचार सुरू आहेत. ० ते ६ वयोगटांतील हे कुपोषित बालक कमी वजनाचे असून त्यांच्यावर १४ दिवस उपचार करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी स्पेशल वॉर्ड करण्यात आल्याची माहिती डॉ. भडांगे यांनी दिली. या १४ दिवस त्यांच्या माताही या केंद्रात राहणार आहेत व ६० रु. प्रतिदिन बालक खर्च करण्यात येणार असून हा १४ दिवसासाठी खर्च करण्यात येणार आहे, तर ४० रु. औषधपुरवठा, दैनंदिन गरजेच्या वस्तू, डिस्चार्ज झालेल्या बालकांना औषधपुरवठ्यासाठी ८०० रु. प्रतिबालक ३ महिने व आईला ६० रु. आहार व ६० रु. बुडीत मजुरी देण्यात येणार आहे.
कुपोषितांवर १४ दिवस उपचार
By admin | Published: February 01, 2016 1:06 AM