ठाणेकोरोनाच्या संकटाशी सामना करत असतानाच आता 'बर्ड फ्लू'च्या उद्रेकानेही चिंतेत भर घातली आहे. मध्य प्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये 'बर्ड फ्लू'ने शिरकाव केला आहे. त्यात आता महाराष्ट्राचीही चिंता वाढवणारी घटना ठाण्यात समोर आली आहे.
ठाण्यात तब्बल १४ बगळे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोंड हेरॉन, म्हणजे पाण बगळा जातीचे हे पक्षी आहेत. एकूण 14 पक्षांचा मृत्यू झाला आहे. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने तर झाला नाही ना? अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरातील विजय गार्डन येथील ही घटना आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये 'बर्ड फ्लू'मुळे शेकडो पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यात महाराष्ट्रात अद्याप 'बर्ड फ्लू'ची एकही घटना समोर आली नसल्याचं वनविभागाने जाहीर केलं होतं. पण ठाण्यातील आजच्या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. दरम्यान, वनविभागाने मृत पक्षी जमा केले असून त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
पाच राज्यांमध्ये 'बर्ड फ्लू'चा कहरगेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान आणि पंजाबमध्ये शेकडो पक्षी मृतावस्थेत सापडले आहेत. यात मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात १ हजाराहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. केरळ राज्यात तर बर्ड फ्लूचा प्रसार झालेल्या दोन जिल्ह्यांमधील काही भागात कोंबड्या आणि बदकांची कत्तल करण्याचे आदेश जाहीर केले आहेत. बर्ड फ्लूचे मानवात संक्रमण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.