ठाणे : मुलाच्या वाढदिवसानिमित्त बँकेतील सोन्याचे आणि हि-यांचे दागिने काढून ते घरी घेऊन जाणा-या मनोज सनये (४४) यांच्याकडील १४ लाख ३० हजारांचे दागिने दोघा भामट्यांनी लुबाडल्याची घटना सोमवारी दुपारी समतानगर भागात घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवदयानगरातील ‘कॉसमॉस पॅराडाईज’ या इमारतीमध्ये राहणा-या सनये यांच्या मुलाचा २८ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. तसेच त्यांना घर खरेदीही करायची असल्याने त्यांनी समतानगरच्या एचडीएफसी बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेले दागिने २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास काढले. बँकेच्या बाहेर पडल्यानंतर त्यांच्या दुचाकीला बॅग लावून ते घरी जात होते. त्याचवेळी त्यांना एका भामट्याने पाचशेच्या नोटा खाली पडल्याचे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले. तेंव्हा त्यांनी दुचाकीला लावलेली दागिन्यांची बॅग तशीच ठेवून खाली पडलेल्या नोटा घेण्यासाठी दुचाकी बाजूला उभी केली. ते दोन पाऊले पुढे आले, त्याचवेळी अन्य एकाने येऊन दुचाकीला लावलेली त्यांची पिशवी घेऊन तिथून पलायन केले. बॅग घेऊन पसार झालेल्या भामट्यांचा त्यांनी काही अंतर पाठलागही केला. मात्र, वाहतुकीच्शस गर्दीचा फायदा घेऊन तो तिथून निसटण्यात यशस्वी ठरला. हा सर्व प्रकार जवळच्याच एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या चित्रणाच्या आधारे पोलीस आता या दोन्ही भामट्यांचा शोध घेत आहेत. सनये हे गोरेगाव येथील एका खासगी कंपनीत विक्री व्यवस्थापक असून त्यांनी बँक लॉकरमधून काढलेले आठ लाखांचे १०० ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे सिक्के, ५० ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे सिक्के असे ४०० ग्रॅम वजनाचे सिक्के, एक लाख २५ हजारांचे हिरेजडीत सोन्याचे बे्रसलेट, ६० हजारांची सोन्याची हिरेजडीत अंगठी, एक लाख २५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र याव्यतिरिक्त अन्य काही दागिने असे १४ लाख ३० हजारांचे दागिने लक्ष विचलीत करून चोरल्याची तक्रार त्यांनी सोमवारी दुपारी दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक एस. एस राजपूत हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ठाण्याच्या समतानगर येथे बँकेबाहेरच १४ लाख ३० हजारांच्या दागिन्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 8:45 PM
पाचशेच्या नोटा पडल्याचा बहाणा करीत लक्ष वेधल्यानंतर दोघांपैकी एका भामटयाने दुचाकीस्वाराकडील १४ लाख ३० हजारांच्या दागिन्यांच्या ऐवजाची बॅग घेऊन पलायन केल्याची घटना ठाण्यात घडली.
ठळक मुद्देनोटा पडल्याचा बहाणा करुन लक्ष वेधलेलक्ष वेधल्यानंतर दुस-याने केले दागिने लंपासलुटीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद