ठाणे : पांढरा हत्ती म्हणून ओळख असलेल्या ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडीअमने आपली ही ओळख पुसण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार आता यंदा प्रथमच या स्टेडीअमवर भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या मान्यता स्पर्धेचे एकूण १४ सामने होणार आहेत. यात विजय हजारे क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांचाही समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या क्रिडा विभागाने दिली.
यंदाच्या मोसमात स्टेडीअमवर विजय हजारे ट्रॉफीचें सात सामने होणार आहेत. २०१८-१९ मध्ये बीसीसीआय व आयसीसी यांच्या अटी शर्तीप्रमाणे देशातील नामवंत क्युरेटर नदिम मेमन यांच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय दजार्ची विकेट व आऊट फिल्ड बनविण्यात आली होती. २०२० जानेवारी मध्ये बीसीसीआय लेव्हल - १ च्या महिलांच्या १२ मॅचेस खेळविण्यात आल्या होत्या. तसेच दादोजी कोंडदेव स्टेडीयम हे आता बीसीसीआयच्या पॅनलवर आल्याने भारतरत्न सचिन तेंडुलकर व क्रिकेटपट्टू विरेंद्र सेहवाग यांनी स्वत:च्या अकॅडमीसाठीचे चित्रीकरण करण्यासाठी स्टेडीयमची निवड केली होती. मागील तीन वर्षे आयपीएल मधील कलकत्ता नाईट राईडर्स च्या संघातील खेळाडू स्टेडीयम सराव करत आहेत. मागील वर्षी विजय हजारे करंडकाचे सात सामने या मैदानात खेळविण्यात आले होते. त्यानंतर सलग तिसºया वर्षी यंदाही बीसीसीआय लेव्हल - १ ची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सात सामने दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर खेळविण्यात येणार आहे.
बीसीसीआय ने त्यांच्या यावर्षीच्या स्पर्धेच वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात याची सुरुवात २३ नोव्हेंबर ला होणार असून पहिला सामना बडोदा विरुद्ध पंजाब असा समाना या मैदानात खेळविला जाईल. तर शेवटचा सामना ५ डिसेंबर ला बंगाल विरुद्ध पंजाब असा होईल. त्यानंतर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या २३ वषार्खालील महिला गटाच्या सामन्यांना सुरुवात होईल. यात मुख्य सामन्यांना २६ जानेवारीला सुरुवात होऊन ५ फेब्रुवारी पर्यंत एकूण सात सामने येथे खेळवले जातील. हे सर्व ५० षटकांचे एकदिवसीय सामने असतील. परिणामी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यात ठाणेकर क्रीडाप्रेमींना येथे राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.याबाबत ठाणे महापालिकेच्या क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांच्याशी संपर्क साधला असता. त्या म्हणाल्या की आम्हाला जे वेळापत्रक प्राप्त झाले आहे त्यानुसार राष्ट्रीय स्तरावरील विजय हजारे करंडकाचे ५० षटकांचे सात एकदिवसीय सामने येथे होणार आहेत. तसेच महिलांचेही एकदिवसीय सामने होतील. त्यादूष्टीने आमची तयारी सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान सोमवारी आय पी एल मधील कोलकत्ता नाईट रायडर्स च्या संघाने येथे सराव सुरु केला आहे. यावेळी या संघाचे मेंटर अभिषेक नायर, चंद्रकांत पंडित आदी उपस्थिती होते.