- सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील महापालिकांच्या पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात येणारे शाई धरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले. यातून कोकण पाटबंधारे महामंडळाची मनमानीदेखील उघड झाली. मात्र, एवढ्यावर समाधान न मानता या नदीच्या खोऱ्यातील ५२ गावांनी १४ छोटे बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. शाई धरणाऐवजी याबंधाऱ्यांतील पाणी महापालिकांसह सिंचनासाठी मुबलक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे. शाई धरण बांधण्याचा शासनाचा अट्टहास आहे. त्याविरोधात शहापूर तालुक्यातील सहा व मुरबाडच्या पाच आदी ११ ग्रामपंचायतींमधील ५२ गावांतील ग्रामस्थांचा सुमारे दहा वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. परंतु, सिंचन घोटाळ्यात अनधिकृत प्लॅनमुळे सुमारे आठ महिन्यांपूर्वी नियोजित काळू व शाई धरणांतील भ्रष्टाचारही उघड झाला. त्यामध्ये ठेकेदारासह अन्य तिघांना अटक झालेली आहे.सुमारे तीस हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या नावाखाली सुमारे दहा वर्षांपासून आंदोलन तीव्र केले. त्यात ४२ गावकऱ्यांवर खटले दाखल झाले. आंदोलनात त्यांना काही अंशी यश मिळाले तरी ते त्यात भारावून गेले नाहीत. त्यांनी शाईऐवजी छोट्याछोट्या बंधाऱ्यांद्वारे पाणी देण्यासाठी एकमत केले. याशिवाय, सुमारे १६०० कोटी खर्चाऐवजी केवळ साडेचारशे कोटी रुपये खर्च होणार असल्याचे जिल्हा प्रशासनास पटवून दिल्याचे शाई धरणविरोधी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग वारघडे यांनी सांगितले. ५२ गावपाड्यांना संभाव्य शाई धरणामुळे जलसमाधी मिळणार आहे. शिवाय, साडेतीन हजार हेक्टर शेतजमीन तर १२०० हेक्टर वनजमिनीला मुकावे लागणार आहे. यामुळे ते टाळून नियोजनापेक्षा जास्त पाणी साठवता येणारे बंधारे बांधण्याचा शास्त्रोक्त सल्ला या शेतकऱ्यांनी शासनास दिला. ठाणे पालिकेचे पाणी अन्य महापालिकांनाप्रथमत: ठाणे महापालिकेसाठी असलेल्या धरणाचे पाणी अन्य महापालिकांनाही देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, छोट्या बंधाऱ्यांद्वारे ठाण्यासह सर्वांना मुबलक पाणी मिळणे शक्य आहे. त्यासाठी करवेली दरी, शेकटवाडी, बोकडखंड, चांगदेवाचा खोरा, दऱ्याचा बंधारा या ठिकाणांचे सर्वेक्षणही आधीच झाले आहे. उर्वरित उंबराचा खोरा (घोंगडीचा बंधारा), बांदणाचा ओव्हळ, कुंदाचीवाडी, काळू नदीवर साखरवाडीजवळ वाल्हीवऱ्याचा खोरा या ठिकाणी छोटी धरणे बांधून त्यातील पाणी शाई, काळू, डोईफोडी, कानवी या नद्यांमध्ये सोडून ते पुढे काळूच्या साहाय्याने टिटवाळ्यापर्यंत सहज आणून तेथून नेहमीप्रमाणे इतर सर्व महापालिकांना कमी खर्चात देता येणार असल्याच्या अहवालास आता चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
शाईच्या खोऱ्यात १४ छोटे बंधारे
By admin | Published: November 22, 2015 1:18 AM