लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चोरी, जबरी चोरीतील सोन्याचे दागिने, नऊ मोबाइल आणि पाच लाखाची मोटरकार असा तब्बल आठ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल ठाणे आणि मुंबईतील १४ फिर्यादींना ठाण्याचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी मंगळवारी परत केला. आपला चोरीतील ऐवज सुखरूप मिळाल्याने या सर्व फिर्यादींनी कापूरबावडी पोलिसांचे आभार व्यक्त केले.गेल्या वर्षभरात कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून चोरी तसेच जबरी चोरी झालेल्या ऐवजाची तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख तसेच विद्यमान वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे, संजय निंबाळकर, प्रियतमा मुठे (गुन्हे प्रकटीकरण) आणि सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे आदींच्या पथकाने छडा लावला. यातील ऐवज हस्तगत केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर २१ डिसेंबर रोजी तो संबंधितांना अतिरिक्त पोलीस आयुक्त कुंभारे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यामध्ये राहुल पवार (रा. मानपाडा), अशोक विनलकर (बाळकूम), धीरज गिरी (कापूरबावडी नाका), शुभम जैस्वाल (बाळकूम), शलाका जाधव (माजीवडा), दिगंबर पाटील (मुलुंड), श्वेता दुबे (वागळे इस्टेट), हरिशंकर रबारी (भिवंडी) आण िसुनील खरात (समतानगर, ठाणे) या सर्वांना एक लाख ६० हजाराचे नऊ मोबाइल परत मिळाले.* याव्यतिरिक्त कल्याणचे श्रीकांत मांजे यांचा लॅपटॉप, बाळकुमच्या मेघा बोरकर यांची पाच लाखाची मोटरकार, तारा वायकर यांचे ६० हजाराचे सोन्याचे दागिने, ताराबाई पोळ यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ममता काळे यांची ४७ हजाराची सोन्याची लगड असा आठ लाख २१ हजाराचा ऐवज परत करण्यात आला.
‘‘आमच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी ९९ हजार ९९९ च्या एका लॅपटॉपची चोरी ३ नोव्हेंबर २०२१ रोजी केली. ती कापूरबावडी पोलिसांनी उघडकीस आणून हा लॅपटॉप मिळवून दिला. पोलिसांच्या कार्याला सलाम.श्रीकांत मांजे, व्यवस्थापक, विजय सेल्स, ठाणे