लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : नवी मुंबईतून वगळलेल्या १४ गावांना नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी २०१४ पासून शिवसेना सातत्याने पाठपुरावा करीत असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विलंबामुळे अपूर्णावस्थेत असलेली पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे १४ गावांपैकी १० गावांना महिनाभरात पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी दिली.
शुक्रवारी आमदार राजू पाटील यांनी त्या भागात जाऊन पाणीपुरवठा कामाची पाहणी केली. रमेश पाटील यांनी ही योजना प्रत्यक्षात आणण्याकरिता शिवसेनेने कसे प्रयत्न केले याची माहिती दिली. ते म्हणाले, सन २०१४ साली दहिसर गोठेघर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना शिवसेनेच्या प्रयत्नामुळे मंजूर झाली. त्यासाठी ६ कोटी ४२ लाखांचा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. १४ गावांपैकी १० गावांमध्ये जलकुंभ उभारण्यात आल्यानंतर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठा योजनेला विलंब होत गेला. योजनेचे काम ठेकेदाराने दोन वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने जीवन प्राधिकरणाने ठेकेदाराला दंड आकारला. त्याविरोधात ठेकेदाराने न्यायालयात दाद मागितली. अखेरीस न्यायालयाने ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकले. त्यामुळे योजना चार वर्षे रखडली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, ठाणे यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेसाठी ग्रामीण पाणीपुरवठा टंचाई योजनेमधून १ कोटी ७४ लक्ष २९ हजार ६०१ रुपयांना मंजुरी दिली. सदर योजनेतील जुनी पाइपलाइन वेळोवेळी फुटत असल्यामुळे पाणी वाया गेल्याने एमआयडीसीने ४९ लाख रुपयांचे व्याज व विलंब शुल्क आकारले होते. माजी आमदार सुभाष भोईर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे व्याज व विलंब शुल्काची रक्कम माफ करून मुद्दलाचे चार लाख २१ हजार रुपये पाच ग्रामपंचायतींनी भरले.
सध्या १४ गावांपैकी दहिसर, नावाली, दहिसर मोरी, मोकाशीपाडा, भंडार्ली, नागांव, उत्तरशिव, कर्मनगरी, पिंपरी, निघू या गावांतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. उर्वरित नारिवली, बाळे, वाकळण व बामाली या चार गावांनाही योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले.
.......
माजी आमदार रमेश पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची दहिसर-गोठेघर पाणी योजना (६.४३ कोटी) २०११ ते २०१४ या कालखंडात मंजूर करून आणली होती, परंतु ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे रखडली होती. मी आमदार म्हणून निवडून आल्यावर योजनेची माहिती घेतली व नवीन ठेकेदाराला काम देण्याच्या सूचना दिल्या. नवीन ठेकेदारास काम सुरू करण्यास विलंब होईल हे लक्षात आल्याने कल्याण पंचायत समिती बीडीओ पालवे यांच्यासोबत बैठका घेऊन पाण्याच्या टाकीपासून गावात पाण्याची लाइन फिरवावी, अशा सूचना केल्या. स्थानिक जि.प. सदस्यांनीपण त्याचा पाठपुरावा केला आहे हे नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण, २०१४ ला सुरू झालेली ही योजना बंद होती तेव्हा हे झोपले होते का?
- राजू पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण मतदारसंघ
..........
वाचली.