जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: डोंबिवलीतील भोपर तसेच सागाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांसह तब्बल ३१ जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २१ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लोकमत ला दिली.याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात या मुलीच्या कथित प्रियकरासह ३१ जणांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल झाला आहे. याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस आयुक्त जयजित सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांच्या आदेशाने मानपाडा पोलिसांनी गेल्या सात ते आठ तासांमध्ये २१ जणांना ताब्यात घेतले आहे. पिडित मुलीची दोन तरुणांशी मैत्री होती. त्यांच्यातील एकाने सुरुवातीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर त्याच्या मित्रानेही तिला ब्लॅक करीत अत्याचार केले. त्यानंतर या दोघांनी एका व्हिडिओच्या आधारे पुन्हा वेगवेगळया ठिकाणी अन्य मित्रांना वाढदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली तिला त्यांच्याकडे स्वाधीन केले. त्यांनीही तिच्यावर आळीपाळीने सामुहिक लैंगिक अत्याचार केले. गेली आठ ते नऊ महिने हा प्रकार सुरु होता. भीतीपोटी तिने घरात या प्रकाराची वाच्यताही केली नाही. तिच्या एका नातलग महिलेला या प्रकाराचा संशय आल्याने तिने विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला. बुधवारी तिच्या पालकांनी आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मानपाडा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकाराची सूत्रे हालविली. प्राथमिक चौकशीत आधी २९ आरोपींची नावे समोर आली. नंतर आणखी दोघांची नावे समोर आल्याने यात ३१ जणांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी गेल्या काही तासांमध्ये २१ जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला सहायक आयुक्त सोनाली कदम -ढोले यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डोंबिवलीतील एका १४ वर्षीय मुलीवर ३१ जणांचा सामुहिक अत्याचार
By जितेंद्र कालेकर | Published: September 23, 2021 1:14 PM
डोंबिवलीतील भोपर तसेच सागाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांसह तब्बल ३१ जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
ठळक मुद्दे २१ आरोपी अवघ्या काही तासात ताब्यातठाण्यात खळबळ