लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : वसई विरार महानगरपालिकेने शहरातील ए ते आय या नऊ प्रभागातील १४० इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करून ३६९ इमारतींना नोटिसी देत खाली करून दुरुस्ती करण्यासाठी सांगितले आहे. तर ९९९ इमारतींमध्ये रहिवासी राहत असून त्या इमारती खाली न करता दुरुस्त करणे व १२ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी सांगण्यात आले आहे.
वसई विरारमध्ये ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडून जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. भविष्यात अशी कोणतीही दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी महानगरपालिकेने या इमारती रिक्त करून कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. सर्वेक्षण केलेल्या इमारतीपैकी १४० इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. तर ३६९ इमारतींना नोटिसा देऊन खाली करून दुरुस्ती करण्यासाठी सांगण्यात आले आहे. मनपाने आतापर्यंत १५ अतिधोकादायक इमारती निष्कासित केलेल्या असून १९ इमारती खाली केल्या आहेत. ९९९ इमारती खाली न करता त्याची दुरुस्ती सुचविली असून १२ इमारतीला किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान अनेक वर्ष जुन्या इमारतींना नोटिसा देऊन, त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी काहीं इमारती अतीधोकादायक व धोकादायक निघण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
वालीव प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक ३१ इमारती अतिधोकादायक असून विरार पूर्व बी प्रभाग समितीमध्ये सर्वात कमी ६ इमारती आहेत. यानंतर चंदनसार सी प्रभाग समितीमध्ये १५, आचोळे डी प्रभाग समितीमध्ये २०, नालासोपारा पश्चिम ई प्रभाग समितीमध्ये १९, पेल्हार एफ प्रभाग समितीमध्ये ११, नवघर माणिकपूर एच प्रभाग समितीमध्ये १३ तर वसई गाव आय प्रभाग समितीमध्ये १४ इमारती अतिधोकादायक आहेत. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना झाल्यास किंवा बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याची पर्यायी व्यवस्था किंवा ट्रान्झिट कॅम्पची सुविधा उपलब्ध केली जाईल असे उपायुक्त दीपक झिंझाड यांनी लोकमतला सांगितले आहे.
१) अतिधोकादायक व धोकादायक प्रवर्गातील मिळकतीचे स्ट्रक्चरल ऑडीट ज्या मिळकती धारकांनी पूर्ण केलेले नाही. त्यांचे ऑडिट हे मनपाने पूर्ण केलेले असून नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तात्काळ सदरच्या मिळकती रिक्त कराव्यात व भविष्यात होणारी दुर्घटना टाळावी. - अनिलकुमार पवार (आयुक्त, मनपा)