मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमुले 143 रेल्वे कामगारांची दिवाळी साजरी झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात काम करणाऱ्या 143 कामगारांचे वेतन रेल्वेने थकित ठेवले होते. विशेष म्हणजे दिवाळी असतानाही पगार न झाल्याने कामगारांकडून तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन पुकारण्यात आले. मनसेनं या आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर, कामगारांना दिवाळीच्या एक दिवस अगोदरच वेतन देण्यात आले.
राज्यातील एसटी कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. त्यानंतर, राज्यात सरकारविरोधात चांगलाचा रोष निर्माण झाला होता. त्यामुळे, सरकारने तातडीने बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन तत्काळ देण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कामगारांच्या खात्यावर एक महिन्याचा पगार जमाही करण्यात आला. राज्यातील या एसटी कामगारांप्रमाणेच ठाणे रेल्वे स्थानकात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 143 कामगारांचे वेतन ठेकेदार कंपनीकडून थकविण्यात आले होते. त्यामुळे कामगारांनी आंदोलन पुकारल्यानंतर मनसे रेल्वे संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. तसेच, दिवाळीच्या तोंडावर कामगारांना तातडीने पगार देण्याची मागणी केली.