ठाणे : बेस्टने तिकीटदरात कपात केल्यानंतर आता ठाण्यातही टीएमटीचे तिकीटदर कमी करण्यासाठी शिवसेनेसह प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, जर तिकीटदर कमी झाले तर वार्षिक फटका तर बसणार आहेच, शिवाय ते कमी केले नाही तरीही प्रवाशांच्या संख्येत घट होणार आहे. त्यामुळे तिकीटदर कमी करायचे की वार्षिक तोट्याला सामोरे जायचे, अशा पेचात ठाणे परिवहनसेवा अडकली आहे. त्यात येत्या महिनाभरात बेस्टच्या ताफ्यात ४०० एसी बस दाखल होणार असून तिचे लांब पल्ल्याचे दर हे केवळ २५ रुपये असणार आहेत. टीएमटीच्या एसी बसचे दर हे ८५ रुपये आहेत. त्यामुळे सर्वाधिक फटका यामुळे टीएमटीला बसणार असून ठामपाने अनुदान देण्यात आखडता हात घेतल्याने उत्पन्न खर्चाचा ताळमेळ बसविण्याच्या नादात टीएमटीला तब्बल १४५ कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे.
ठाणे परिवहनसेवेचे पहिल्या दोन किमीचे दर हे आजघडीला ७ रुपये असून पाच किमीपर्यंतचे दर हे १३ रुपये आहेत. मुंबईप्रमाणे ठाण्यातही शिवसेनेच्या परिवहन समितीच्या सदस्यांनी परिवहनच्या तिकीटदरात कपात करण्याची मागणी लावून धरली आहे.विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी परिवहनची वाढती तूट भरून काढण्यासाठी तिकीटदरवाढीचा प्रस्ताव पुढे आला होता. परंतु, तो फेटाळण्यात आला आहे. असे असतांना आता बेस्टमुळे परिवहनसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.अनुदान १०० कोटीचपरिवहनला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवितांना आजघडीला सुमारे ८५ कोटींच्या आसपास फटका बसत आहे. परंतु, जर तिकीटदर कमी केले तर त्यात आणखी जवळपास वार्षिक ६० कोटींची भर पडणार आहे. त्यामुळे वार्षिक १३० कोटींचा तोटा परिवहनला बसणार असून खर्चाची बाजू पूर्णपणे कोलमडणार आहे. आजच परिवहनला जर महापालिकेडून ३०० कोटींचे अनुदान अपेक्षित असेल तर १०० कोटींच्या आसपासच मिळत आहे. परंतु तिकीटदर कमी केले तर हा आर्थिक बोजा परिवहनच्या खांद्यावरच अधिक पडणार आहे.एसी बसच्या दरामुळेही मोडणार कंबरडेठाणे परिवहनचा उत्पन्नाचा प्रमुख खांब हा एसी बस आहे. ठाणे ते बोरिवली, अंधेरी या मार्गावर त्या बस धावतात. परिवहनसेवेला ठाणे ते बोरिवली या मार्गावरच एसी आणि साधे बसचे मिळून सुमारे ६ लाखांच्या आसपास उत्पन्न आहे. परिवहनचे तिकीट ठाणे ते बोरिवली ८५ रुपये आहे. परंतु, बेस्टच्या ताफ्यात एसी बस दाखल होणार असून तिचे भाडे केवळ २५ रुपये असणार आहे. त्यामुळे प्रवासी हे बेस्टने प्रवास करण्यास प्राधान्य देतील, अशी शक्यता आहे.
ही धोरणात्मक बाब असल्याने त्याचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.- संदीप माळवी, परिवहन व्यवस्थापक, ठामपा