लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील एक लाख ४५ हजार ४१ ग्रामस्थांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने शुक्रवारपर्यंत पूर्ण केले असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची सुविधा सर्व शासकीय लसीकरण केंद्रावर केली आहे. यासाठी ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र,९९ उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपरुग्णालयामध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध केलेली आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी दांगडे, यांनी स्वतः लक्ष केंद्रित करून आरोग्य विभागाला मार्गदर्शन केले. यास अनुसरून शुक्रवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय सखोल आढावा घेतला असता तब्बल दीड लाख ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असतानाच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची प्रक्रिया सहजसुलभ व्हावी यासाठी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर नोंदणीची सुविधा उपलब्ध केली आहे.
या लसीकरणासोबतच नागरिकांची आरोग्यतपासणी, सर्वेक्षण आणि कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले असून त्यानुसार यंत्रणा कार्यरत असल्याचे या आढावा बैठकीस उघड झाले. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, चंद्रकात पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे उपस्थित होते.
लसीकरणाची तालुकानिहाय आकडेवारी
अंबरनाथ – २१,३३०
भिवंडी - ४७,९९८
कल्याण - १९,८९४
मुरबाड - १९,८५३
शहापूर - ३५,९६६