पंकज रोडेकर
ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत साधारणत: प्रत्येक महिन्याला विनयभंगाच्या एक ते दोन घटना घडत आहेत. चालू वर्षातील १० महिन्यांत जवळपास १५ विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. त्यातील १३ गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक केली आहे. दोन गुन्ह्यांमधील आरोपींचे अचूक वर्णन व माहिती न मिळाल्याने ते अद्यापही फरार आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी तत्काळ तक्रार दिली आणि आरोपीचे अचूक वर्णन दिल्यास आरोपीला तत्काळ पकडणे शक्य होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाऊबीजेसाठी ठाणे, कळव्यातील २२ वर्षीय तरुणी लोकलने कुर्ला येथे जाताना बदलापुरातील तरुणाने ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक ६ वर तिचा विनयभंग केला. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा रेल्वेस्थानकांत तसेच लोकल प्रवासात महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी २०१८ मधील १ जानेवारी ते ११ नोव्हेंबरदरम्यान विनयभंगाचे १५ गुन्हे दाखल झाले आहेत. जानेवारी महिन्यात दोन, तर फेब्रुवारीत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात एकही गुन्हा दाखल झाला नाही. दोन गुन्ह्यांमधील आरोपी फरार झाले आहेत.