कल्याण : कुख्यात गँगस्टार नन्नू शहा याच्या वाढदिवसाचे बॅनर शहरात झळकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे केडीएमटीच्या बस स्टॉपवरही ‘भाई’च्या बड्डेचा बॅनर झळकला आहे. या बेकायदेशीर बॅनरवर केडीएमसी प्रशासनाकडून कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात आहे.
शहरात अनेक ठिकाणी शहा याच्या वाढदिवसाचे बॅनर त्याच्या ‘चाहत्यां’नी लावले आहेत. कल्याणमध्ये भाईचा वाढदिवस जोरात साजरा होत असल्याचे दिसत आहे. ही बॅनरबाजी शहरात चर्चेचा विषय बनली आहे. नन्नू शहाच्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी गंभीर स्वरुपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, वसुली यासारखे गंभीर गुन्हे आहेत. गेल्याचवर्षी शहा याचा मित्र मटकाकिंग जिग्नेश ठक्कर याची गोळया घालून हत्या केली गेली. या हत्येच्या आरोपाखाली शहा जेलमध्ये अंडरट्रायल कैदी आहे. त्याच्या वाढदिवसाचा बॅनर बिर्ला कॉलेजच्या केडीएमटीच्या बस स्टॉपवर झळकला आहे. महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी हा विषय त्यांच्याशी संबंधित नसून, केडीएमटीचे उपायुक्त दीपक सावंत यांच्याकडे असल्याचे सांगितले. केडीएमटीचे उपायुक्त सावंत यांच्याकडे विचारणा केली असता, याविषयी मी अधिक बोलू शकत नाही. माहिती घेऊन प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जाईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले. संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी त्यांच्या प्रभागात एकच बॅनर लावला होता. त्याठिकाणचा बॅनर काढण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र अन्य ठिकाणीही बॅनर आहेत. ते आपल्या हद्दीत नसल्याचे सांगत काखा वर केल्या.
फोटो-कल्याण-भाईचा बड्डे
..............
वाचली