ठाणे : येथील दहिसर मोरीत पावणेआठ कोटींच्या विविध प्रकारच्या डाळींचा साठा जप्त केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने तीन गोदामांवर छापा टाकून एकूण १ हजार ६९२ मेट्रीक टन रशिया-आॅस्ट्रेलिया येथील चिक पिस (तूरडाळ) आणि कॅनडा रेड मसूर आणि इतर कडधान्यांचा साठा जप्त के ला आहे. त्याची किंमत १५ कोटींहून अधिक असून याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.मुंब्रा-पनवेल रोडवरील मेसर्स सिद्धिविनायक लॉजिस्टिक प्लॉट २०२ येथील तीन गोदामांत तूरडाळ व इतर कडधान्यांचा बेकायदेशीर साठा ठेवल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या आणि शिधावाटप अधिकारी रत्नदीप तांबे यांच्या पथकांनी संयुक्तरीत्या तेथे छापा टाकून कारवाई केली. त्या वेळी त्या गोदामांमध्ये रशिया चिक पिस, होल तूर, आॅस्ट्रेलिया चिक पिस, कॅनडा रेड मसूर इत्यादी कडधान्यांनी भरलेल्या प्रत्येकी ५० किलोंच्या गोण्या आढळल्या असून त्यांचे वजन एकूण १ हजार ६९२ मेट्रीक टन आहे. हा सर्व साठा जप्त के ला असून त्याची किंमत १५ कोटी नऊ लाख ७१ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी शिधावाटप अधिकारी तांबे यांनी मेसर्स सरस्वती पल्सेसचे पवन अगरवाल, श्लोक ट्रेडर्स व धवल फुड्स प्रायव्हेट लि.चे अमित जाधव आणि आशीर्वाद अॅग्रोचे राहित खिलवाणी या तिघांविरोधात शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
मुंब्य्रात १५ कोटींच्या डाळींचा साठा जप्त
By admin | Published: October 25, 2015 1:18 AM