सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील बाल शिवाजी उद्यान, हिराघाट बोट क्लब सुशोभीकरण, महिला भवन व मराठी संस्कृती भवनासाठी एकूण १५ कोटी ५० लाखांच्या निधीला शासनने मंजुरी दिली. असे प्रसिद्धीपत्रक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयातून काढण्यात आले असून महापालिका शहर अभियंता तरुण सेवकांनी यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
उल्हासनगरातील क्रीडा संकुल, सांडपाणी योजना, पाणी योजना, चार्जिंग स्टेशन आदी प्रकल्पासह परिवहन सेवा सुरु करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्याच पुढाकाराने कॅम्प नं १ येथील बाल शिवाजी उद्यान उभारणीसाठी ५० लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नगरोत्थान महाअभियानांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून या प्रकल्पांकरिता शासनाने आपला हिस्सा देण्यास मंजुरी दिली. तसे पत्र शासनाकडून आल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता तरुण सेवकांनी यांनी दिली.
बाल शिवाजी उद्यान विकासासाठी, महिला व मराठी संस्कृती भवन व हिराघाट बोट क्लबचे सुशोभीकरण या चार प्रकल्पांसाठी एकूण १० कोटी ८५ लाख रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. एकूण १५ कोटी ५० लाख रूपयांच्या खर्चातून हे प्रकल्प उभारले जाणार असून त्यामध्ये ३० टक्के निधीचा हिस्सा महापालिकेचा राहणार आहे.
शहरातील बाल शिवाजी उद्यानासाठी पालिकेचा हिस्सा १५ लाख असून शासनाने ३५ लाख मंजूर केले. कॅम्प तीन भागात बोट क्लबचे सुशोभीकरणासाठी एकूण ५ कोटीचा खर्च असून या प्रकल्पासाठी शासनाने ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले. तर कॅम्प-५ मध्ये महिला भवन उभारणीसाठी ५ कोटींचा खर्च असून शासनने ३ कोटी ५० लाख रूपये मंजूर केले. शहर पूर्वेत मराठी बांधवांची संख्या मोठी असून मराठी भवनासाठी एकूण ५ कोटीचा खर्च येणार असून शासनाने ३ कोटी ५० लाखाचा हिस्सा देण्याला मंजुरी दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या प्रकल्पांला मंजुरी मिळाली असून शहराला वेगळी ओळख मिळणार असल्याचे बोलले जाते.