ठाणे: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले. या महामार्गावर अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.त्यासाठीच तीन कोटींच्या खर्चातून महामार्ग पोलिसांना १५ अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनांचे हस्तांतरण केले जात असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.योग्य वेग मर्यादेचे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या खर्चातून ही वाहने महामार्ग पोलिसांना देण्यात आली. ठाण्यातील कोलशेत भागात पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर ही सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. समृद्धी महामार्ग लाखो हातांना काम देणारा मार्ग ठरला आहे. या मार्गामुळे १५ तासांचे अंतर सात तासांवर आले. यातून विकास साधता आला हे महत्वाचे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमातूनही एक कोटी ८० लाख लोकांची कामे झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.७०१ कि.मी लांबीपैकी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर, ता. इगतपुरी (६०० कि.मी.) वाहतूकीस खुला आहे. हजारो वाहने समृद्वीचा प्रति दिन वापर करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी १५ महामार्ग पोलिसांच्या केंद्राकरिता इंटरसेप्टर वाहन उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळांकडे केली होती. त्यानुषंगाने महामंडळाकडून १५ स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी केली. इंटरसेप्टर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या अग्निरोधक उपकरण तसेच पमोपचार किटसह सर्व उपकरणांची जोडणी महामंडळातर्फे केल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत ही वाहने महामार्ग पाेलिसांना हस्तांतरीत करण्यात आली.यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवी फाटक, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह-व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, अनिलकुमार गायकवाड आणि महामार्गाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे शिवसेना प्रवक्तेनरेश म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.
अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसाठी तीन कोटींच्या खर्चातून १५ इंटरसेप्टर वाहने पोलिसांना हस्तांतरित
By जितेंद्र कालेकर | Published: November 27, 2023 8:25 PM