ठाणे: ट्रेडींग करण्यासाठी पैसे भरण्यास सांगून भरत राधेश्याम गुप्ता (२६ वर्षे, रा.धर्मवीरनगर क्रमांक १, वागळे इस्टेट, ठाणे) यांची १५ लाख ३२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी दिली.
धर्मवीरनगर भागात राहणारे भरत गुप्ता यांना १ आॅक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९.४५ ते १४ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अनोळखी मोबाईलधारक भामटयाने व्हॉटस्ॲपवर संपर्क करुन त्यांना
वर्क फ्रॉर्म होमबाबत संदेश पाठविला. त्यासाठी त्यांना गुगल रिव्हयू रेटींग देण्यासही त्याने भाग पाडले. त्यांनतर गुप्ता यांना टेलिग्रामवर आयडी बनवून देउन एका ॲप्लिकेशनवर ट्रेडींग करण्यासाठी पैसे भरण्यास सांगितले. तसेच मोठा नफा मिळण्याचे अमिषही त्यांना दाखविले. त्यानुसार सुरुवातीला काही प्रमाणात त्यांना मोठा नफाही देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना १५ लाख ३२ हजारांची रक्कम वेगवेगळया बँक खाते आणि युपीआय आयडीवर पाठविण्यास सांगितली. त्याबदल्यात त्यांना कोणताही फायदा झाला नाही. उलट, त्यांनी गुंतवणूक केलेली मुद्दलमधील १५ लाख ३२ हजारांची रक्कमही त्यांना परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुप्ता यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क) ६६ (ड) तसेच फसवणूकीचा गुन्हा १३ डिसेंबर २०२३ रोजी दाखल केला. यातील आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक प्रविण माने सांगितले.