ठाणे : ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकताना गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या आॅनलाइनचा सेवा देण्याचे काम येत्या २६ जानेवारीच्या मुहूर्तावर सुरू करण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत तब्बल १६ सेवा आॅनलाइन करण्यात येणार असल्याने विविध कामांसाठी ठाणेकरांना लागणाऱ्या वेळ आणि पैशांची बचत होणार असून वारंवार महापालिकेत माराव्या लागणाऱ्या खेट्यांपासूनही त्यांची सुटका होणार आहे. यातून घरबसल्या विविध दाखलेही मिळणार आहेत.राज्य शासनाने १६ सेवांना सेवा हमी कायदा लागू केला आहे. त्यामुळे ठरावीक वेळेत हे दाखले उपलब्ध करून देणे महापालिका अधिकाऱ्यांना बंधनकारक झाले आहे. जन्म, मृत्यू, मालमत्ता कर, विवाह प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण दाखला, विभागीय दाखला, जोता, बांधकाम वापर परवाना, नळजोडणी, मलवाहिनीजोडणी, अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र आदी महत्त्वाचे दाखले आॅनलाइन देण्याची योजना ठामपाने तयार केली आहे. शासकीय कामकाजासाठी लागणाऱ्या दाखल्यांकरिता ठाणेकरांना महापालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत होत्या. चिरीमिरी दिल्याशिवाय हे दाखले मिळणेही दुरापास्त होत होते. परंतु, राज्य शासनाने १६ सेवांकरिता सेवा हमी कायदा लागू केला आहे. महापालिकेतील १६ सेवांना हा कायदा लागू झाल्याने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली आॅनलाइन दाखले देण्याची योजना तयार केली आहे. तळ मजल्यावरील एका दालनात त्यांचे कार्यालय सुरू केले जाणार आहे. शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त संजय निपाणी आणि संगणक विभागाचे प्रमुख स्वरूप कुलकर्णी यांनी या दालनाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
महापालिकेच्या १५ सेवा होणार आॅनलाइन
By admin | Published: January 09, 2016 2:08 AM