उल्हासनगर : महापालिका आर्थिक डबघाईला आली असतानाही महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी कामगार संघटनेच्या नेत्या सोबत चर्चा करून १५ हजार ५०० रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. दिवाळी बोनस जाहीर झाल्याने, कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. उल्हासनगर महापालिका आर्थिक डबघाईला आली असून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड जाण्यासाठी कर्मचारी संघटनेचे नेते व महापालिका आयुक्त यांच्यात गुरवारी दिवाळी बोनस बाबत बैठक झाली. कर्मचारी संघटनेचे नेते चरणसिंग टाक, राधाकृष्ण साठे, दिलीप थोरात यांच्यासह अन्य नेत्यांसोबत आयुक्त अजीज शेख यांनी बैठक घेऊन कामगार नेत्यांना महापालिकेची आर्थिकस्थिती समजून सांगितली. यावेळी अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मुख्यलेखा अधिकारी भिलारे आदीजन उपस्थित होते.
सुरूवातीला कामगार नेत्यांकडून २१ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. गेल्या वर्षी १५ हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. तेवढाच सानुग्रही अनुदान देण्यास आयुक्तांनी सहमती दर्शविली होती. मात्र कामगार नेत्यांच्या आग्रहाखातर १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. दिवाळी सानुग्रह अनुदान आयुक्त अजीज शेख यांनी जाहीर करताच कामगार नेते व कामगारांनी आनंद व्यक्त केला. महापालिकेत एकून २ हजार १५० पेक्षा जास्त कामगार असून सानुग्रह अनुदान मुळे महापालिका तिजोरीवर सव्वा तीन कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. तसेच दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचा पगार व दिवाळी बोनस- देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेख यांनी दिली.