उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं -3 वडोलगावात मलनिस्सारण केंद्राची भिंत संततधार पावसाने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका घरावर कोसळली. यामध्ये 15 वर्षीच्या मुलाचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले. पालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन धोकादायक भिंती काढण्याचे काम भर पावसात सुरू केले आहे.उल्हासनगर कॅम्प नं - 3 येथील वडोलगाव शेजारी मलनिस्सारण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. केंद्राचे काम करतेवेळी निघालेली माती, दगड भिंती शेजारी टाकण्यात आली. संततधार पावसामुळे मातीचा भार भिंतीवर आल्याने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घायवट त्यांच्या घरावर कोसळली. भिंत कोसळल्याने परिसरात एकच आक्रोश सुरू झाला. स्थानिक नगरसेवक गजानन शेळके, कविता तोरणे-रगडे, समाजसेवक शिवाजी रगडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घायवट कुटुंबाला नातीच्या ढिगाऱ्या खालून काढण्यात आले. मात्र दुर्दैवाने घरात भिंतीशेजारी झोपलेला 15 वर्षाचा किरण धायवट याचा जागीच मृत्यू झाला, तर काका सूर्यकांत घायवट गंभीर जखमी झाले. आई आशा किरकोळ जखमी झाली.महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन इतर घरावर कोलमडलेली भिंत बाजूला करण्याचे काम सुरू केले. महापालिका व मलनिस्सारण केंद्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे एकाच बळी गेल्याचा आरोप शिवाजी रगडे यांनी केला. महापालिका आयुक्तांनी संबंधित ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी रगडे यांनी करून कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली आहे. वडोळगावला जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम अर्धवट असल्याने शालेय मुलासह नागरिकांना 3 ते 4 किमीचा वळसा घालून अंबरनाथ पुलावर जावे लागते. पालिकेने शालेय मुलांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे.
उल्हासनगरात मलनिस्सारण केंद्राची भिंत कोसळून 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तर दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 10:50 AM