लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मोबाईल मध्ये अभ्यास करण्या ऐवजी मुलगा गेम खेळत असल्याचे पाहून आई ने अभ्यास कर म्हटले म्हणून १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली .
भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील गणेश देवल नगरच्या क्रांती नगर रेश्मा इद्रिस बानो यांचा १५ वर्षांचा मुलगा सैफ हा अभ्यास करण्या ऐवजी मोबाईल वर गेम खेळत बसला होता . त्यावेळी आईने त्याला मोबाईल वर गेम न खेळता अभ्यास कर असे सांगितले . त्याचा सैफ ह्याला राग आला आणि त्याने २९ जूनच्या सायंकाळी घरातच गळफास घेतला . त्याला भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले . या प्रकरणी आई रेश्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार भाईंदर पोलिसांनी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .