कल्याण : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर असलेल्या बार, पबवर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा कल्याण-डोंबिवलीतील हाय वे वरील १५० बारना फटका बसणार असल्याची प्राथमिक माहिती कल्याण-डोंबिवली हॉटेल, बार असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिली. कल्याण-शीळ या हाय वे वर साधारणत: ५० बार आहेत. कल्याण-मुरबाड रोड व आग्रा रोड अशा दोन महामार्गांवर एकूण १०० बार आहेत. हाय वे वरील बारमध्ये दारूबंदी केल्यास त्याचा फटका या १५० बारना बसणार आहे. त्यांचे दिवसाला जवळपास हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान होणार असल्याचा अंदाज अध्यक्ष शेट्टी यांनी व्यक्त केला. हे बार बंद झाल्यास बेरोजगारी वाढण्याची शक्यता शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. एका बारमध्ये किमान १५ ते २० वेटर कार्यरत असतात. तसेच काही मोठ्या बारमध्ये एक ते दोन मॅनेजर कार्यरत असतात. एका बारमधील २२ कर्मचारी या न्यायाने तीन हजार ३०० वेटर बेकार होतील. बेकारीमुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारमध्ये दारूबंदी केल्यावर केवळ खाण्यासाठी कोणी येणार नाही. खाण्यासाठी इतर हॉटेल्स, बेकायदा ढाबे आहेत. त्याकडे लोक जातात. दारूबंदी झाल्यावर दारूपान करणारे बारमध्ये कशाला येतील. त्यामुळे बार बंद होतील. एका बारचालकाने त्याच्या बारच्या डिपॉझिटकरिता ३० ते ४० लाख रुपये भरलेले असतात. त्यासाठी तो कर्ज काढतो. इतक्या मोठ्या रकमेची तो कशाच्या आधारे परतफेड करणार. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. कल्याणमधून आग्रा व मुरबाड रोड जात असल्याने तेथे ५०० मीटरचा नियम कसा पाळणार. बारच्या परवान्यांचे नूतनीकरण करूनच मिळणार नाही. आता तर त्याची मुदतही संपलेली आहे. (प्रतिनिधी)
कल्याण-डोंबिवली हाय वे वरील १५० बारला फटका
By admin | Published: April 01, 2017 11:41 PM