Thane Lok Sabha ( Marathi News ) : महाराष्ट्रात १३ जागांसाठी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. मात्र मतदानाला सुरुवात होताच ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी गंभीर आरोप केला आहे. कोपरी, पाचपाखाडी आणि वागळे इस्टेट या भागांमध्ये काही लोक आणून ठेवले असून बोगस मतदान होऊ शकतं, असा दावा विचारे यांच्याकडून करण्यात आला आहे.
"सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान ठाण्यातील काही भागांमध्ये बोगस मतदान करण्यासाठी दीड हजार लोक आणून ठेवल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे मी मतदारसंघातील जागरूक नागरिकांना आवाहन करतो की, तुम्ही सकाळी लवकर जास्तीत जास्त मतदान करा," असं आवाहन राजन विचारे यांनी केलं आहे. तसंच त्यांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली आहे.
ठाण्यात अटीतटीची लढाई
ठाणे लोकसभा मतदारसंघात यंदा प्रथमच दोन शिवसैनिक आमने-सामने आले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नरेश मस्के यांनी आव्हान दिलं आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबल असल्याने ठाण्यात अटीतटीची लढत होत आहे. या मतदारसंघातील मराठी भाषिक ५१ टक्के मते निर्णायक ठरणार आहेत. मराठी मतांचा टक्का अधिकाधिक आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदेसेना आणि उद्धवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघ मीरारोड-भाईंदर ते नवी मुंबई, बेलापूरपर्यंत विस्तारलेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या २३ लाख ७ हजार २३२ एवढी होती. त्यांपैकी ४९.३७ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे आणि निवडणुकीत तेच परस्परांच्या विरोधात उभे ठाकल्याने मराठी मतांचे विभाजन अटळ आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विकासकामे केली आहेत. महापालिकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता राहिली आहे. त्याचा लाभ त्यांना होईल. उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे हे जुने शिवसैनिक आहेत. त्यांनी खासदार निधीतून कामे केली आहेत. त्यावर त्यांची भिस्त आहे.
मतदारांची संख्या किती ?
एकूण २४,०९,५१३पुरुष मतदार १३,३९,५९०महिला मतदार ११,५०,७१६मराठी भाषक १२,९५,०६६ उत्तर भारतीय ५,४७,९१२मुस्लिम २,९८,८६१गुजराती १,७४,३७५पंजाबी, सिंधी ४९,८१०इतर ४९,८१४