बदलापूर : परदेशात दरवर्षी गणेशमूर्ती पाठविण्याचा मान हा बदलापूरला मिळत असतो. यंदाही पंधरा हजार गणेशमूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या असून, हा बहुमान बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सला मिळाला आहे.
बदलापुरातील निमेश जनवाड हा तरुण गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करून परदेशात पाठविण्याचे काम करतो. त्याच्या गणेशमूर्तींना अमेरिकेसह आखाती देश, ऑस्ट्रेलिया येथे मोठी मागणी आहे. यावर्षी बदलापूरहून अमेरिकेसाठी दोन हजार गणेशमूर्तींची पहिली कन्साईनमेंट रवाना झाली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण १५ हजार गणेशमूर्ती अमेरिकेसह कॅनडा, युरोप, आखाती देश, ऑस्ट्रेलिया येथे रवाना झाल्या आहेत.
निमेश याचे गणेशमूर्ती निर्यातीचे हे सहावे वर्ष आहे. २०१९ ला निमेश याने साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठविल्या होत्या, तर मागील वर्षी निर्यात बंद असल्याने त्याला ४० लाख रुपयांचा फटका बसला होता. मात्र, यावर्षी त्याने आतापर्यंत १५ हजार गणेशमूर्ती परदेशात पाठविल्या आहेत. एका मराठी तरुणाने शून्यातून सुरुवात करून घेतलेली ही झेप याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
----------------------------------------------