ठाणे : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी राज्य शासनाने ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १७७ कोटी ७८ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेला दिलेले आहे. यास अनुसरून आतापर्यंत या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना १५१ कोटी ८७ लाखांचे पीक कर्ज वाटप केले आहे, असे या बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
यावर्षी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९५ कोटी १६ लाख रुपये व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८२ कोटी ६२ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्याचा लक्षांक टीडीसीसी बँकेला राज्य शासनाने दिलेला आहे. या शेतकऱ्यांना यंदाही भात, नागरी, वरी, सोयाबीन आदी खरीप पिकांसाठी या कर्जाचे वाटप करण्याचे नियोजन बँकेने केले आहे. बियाणांसह कीडनाशक औषधी, खते आणि मशागतीस लागणाऱ्या खर्चासाठी टीडीसीसी बँकेने खरीप पीक कर्ज योजना लागू केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील १८ हजार २०९ सभासदांना ८६ कोटी २७ लाख १० हजार (९०.६६ टक्के) रुपयांचे कर्ज आतापर्यंत वाटप झाले आहे. याप्रमाणेच तर पालघर जिल्ह्यातील १२ हजार १६३ सभासदांना ६५ कोटी ६० लाख २४ हजार (७९.४० टक्के) रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. या कर्ज वाटपाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी बँकेने सहकारी संस्थांचे सचिव, तपासणीस व शाखा व्यवस्थापक याचा दरमहा व्हीसीद्वारे आढावा घेतला जात आहे. येत्या यंदाच्याही खरीप हंगामात १०० टक्के कर्ज वाटप करण्याचा लक्षांक गाठण्याचे ध्येय ठेवल्याचा दावा पाटील यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला.