ठाणे : कोविडची महामारी सुरू असतानाही ठाणे महानगरपालिकेने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी १६ जुलैपासून विशेष मोहीम सुरू केली असून याअंतर्गत सोमवारपर्यंत जवळपास १५२.६४ कोटी इतकी वसुली केली आहे. यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत सर्वाधिक म्हणजे ४६.०७ कोटी रुपयांची, तर त्याखालोखाल वर्तकनगर आणि नौपाडा-कोपरी विभागाची वसुली केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा हे रोज उत्पन्नवाढीचा आढावा घेत असून मालमत्ताकराबरोबरच इतर करांची वसुली वाढविण्याचे आदेश त्यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.
मालमत्ताकर वसुलीमध्ये दिवा प्रभागामध्ये ५.१४ कोटी रुपये, कळव्यामधून ८.०३ कोटी रुपये, लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभागामधून ८.०९ कोटी रुपये, तर माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधून ४६.०७ कोटी रुपये, नौपाडा-कोपरी प्रभागामध्ये २८.८५ कोटी रुपये इतकी वसुली झाली आहे. तर, उथळसरमध्ये १४.५८ कोटी रुपये, वर्तकनगर प्रभागामध्ये २९.६५ कोटी रुपये वसूल केले आहेत. वागळे प्रभाग समितीमध्ये एकूण ५.९० कोटी रुपयांची वसुली झाली असून मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत ३.७१ कोटी रुपयांची वसुली केली आहे.
२०१९-२०२० या आर्थिक वर्षात १६ जुलै ते ६ सप्टेंबर २०१९ या कालावधीत मालमत्ताकराची एकूण वसुली ४२.०५ कोटी इतकीच झाली होती. त्या तुलनेत या आर्थिक वर्षात तीनपटीपेक्षा जास्त प्रमाणात मालमत्ताकरात वाढ झाली आहे. तथापि, ती वाढविण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांना सूचना दिल्या असून प्रभाग समितीनिहाय आढावा घेऊन ती कशी वाढेल, याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
एका बाजूला संपूर्ण यंत्रणा कोरोना महामारीशी लढत असतानाच दुसऱ्या बाजूला महापालिकेची वसुली वाढावी, याकडेही आम्ही बारकाईने लक्ष देत असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.सुरुवातीचे काही महिने संपूर्ण यंत्रणा कोरोना कोविड-१९ चा सामना करण्यात व्यस्त होती. तथापि, मालमत्ताकर असो वा इतर कर असो, जे महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत, त्यांची वसुली करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन जुलै मध्यापासून आपण मालमत्ताकर वसुलीला प्राधान्य दिले.