ठाणे : एकीकडे कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागल्याने त्याची आचारसंहिता लागली असतानाच त्याच वेळेस महापालिका निवडणुकीचीही आचारसंहिता लागली आहे. पालिकेने आदर्श आचारसंहितेचे पालन करून आतापर्यंत ११९१ पोस्टर, बॅनर काढून १५७ जणांविरोधात आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागली आणि आचारसंहिता सुरू झाली; परंतु ती लागली असतानाही शिवसेनेने लोकार्पणाचा कार्यक्रम हाती घेतला होता; परंतू त्यांना या कार्यक्रमाची परवानगी मिळाली नसली तरीदेखील त्यांनी या कार्यक्रमासाठी ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर, झेंडे लावले होते.महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी ठाण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. या वेळेस संपूर्ण शहरभर झेंडे, पोस्टर, बॅनर लावले होते; परंतु पालिकेने हे पोस्टर, बॅनर बैठक संपल्यानंतर काढल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला होता.त्यानुसार, भाजपावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीने मागणीही केली होती. दरम्यान, काँग्रेसनेही काही ठिकाणी आपले नेते येणार म्हणून बॅनर, पोस्टर्स लावली होती. (प्रतिनिधी)>१ ते ४ जानेवारी या कालावधीत ९६४ बॅनर, पोस्टर, झेंडे काढण्याची कारवाई झाली. यामध्ये ११८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ५ ते १५ जानेवारी या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमेत २२७ पोस्टर, बॅनर काढून ३९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. व ५२१ झेंडे उतरवले आहेत.
आचारसंहिता भंगाचे १५७ गुन्हे दाखल
By admin | Published: January 19, 2017 5:40 AM