ठाणे: चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच, ठाणे (पूर्व) आयोजित गावकीचा वार्षिक १५ वा कोळी महोत्सव रविवार २४ डिसेंबर रोजी सायं. ६ वा. श्री गणेश विसर्जन घाट (कस्टम जेटी), मीठ बंदर रोड, ठाणे (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संयोजन समिती सदस्य विक्रांत सुभाष कोळी यांनी मंगळवारी दिली. नृत्य, गायन, वादन, प्रदर्शन व खाद्य पदार्थ स्टॉल हे या महोत्सवात असणार आहे. यात इच्छुकांनी आपला सहभाग असल्याची नोंद बुधवार २० डिसेंबर पर्यंत विक्रांत कोळी, मातृछाया, चेंदणी कोळीवाडा, ठाणे (पू.) येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. महोत्सवाच्या पूर्व तयारी बद्दल बोलताना दया - काशी नृत्य पथक प्रमुख व ख्यातनाम नृत्य दिग्दर्शक ‘ठाणे गौरव’ प्रफुल्ल कोळी यांनी आमचे पथक या वर्षातील दोन हिट नृत्य सादर करणार असल्याचे सांगितले. पारंपारिक वेशात भव्य शोभा यात्रा, कोळी व लोककलेवर आधारीत गीते, नृत्य आणि नाट्य यांचा रंगतदार कार्यक्रम, कोळी कलाकारांचे हस्त, चित्र व कला यांचे दालन, कोळी लोकजीवन, इतिहास, चळवळ यांचे प्रदर्शन हे या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. समाज म्हणजे सहजीवन, प्रेमभाव, मत आणि मतभेद, राग - रुसवे, वाद विवाद असणारच. परंतू कोळी महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येण्याचे, प्रेमभाव वाढविण्याचे, राग लोभ विसरण्याचे, वादविवाद मिटविण्याचे हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वांनीच या महोत्सवात सहभागी होऊन तो रंगतदार करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी आयोजन समिती, नृत्य पथक, वाद्यवृंद, गायक, स्टॉलधारक, छायाचित्रण, सजावट, प्रदर्शन अशा विविध समिती तयार करण्यात आल्या आहेत. २००२ साली सुभाष कोळी यांनी या महोत्सवाची सुरूवात केली. कोळी समाज एकत्र यावा आणि हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळावे हा उद्देश या महोत्सवाचा होता. सुभाष कोळी यांचे २०१४ साली निधन झाल्यानंतर या महोत्सवाची धूरा त्यांचे सुपुत्र विक्रांत कोळी यांनी सांभाळण्यास सुरूवात केली. गेली तीन सर्वांना एकत्र घेऊन ते हा महोत्सव आयोजित करीत आहेत. यात त्यांना मोलाचे सहकार्य लाभत आहे ते सचिन ठाणेकर, प्रमोद नाखवा, गिरीश कोळी व मनोहर नाखवा यांचे. महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी विनोद नाखवा, प्रफुल कोळी, शाहीर रमेश नाखवा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. चेंदणी कोळीवाडा परिसरातील कलाकार या महोत्सवात सहभागी असतात. दरवर्षी जवळपास पाच हजारांहून नागरिक या महोत्सवात येत असतात. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटन सोहळा हा ज्येष्ठ नागरिकांच्याच हस्ते पार पडत असतो असे विक्रांत कोळी यांनी सांगितले.
ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचचा १५ वा कोळी महोत्सव होणार २४ डिसेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:13 PM
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे पुर्व येथे कोळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात खाद्य पदार्थांबरोबर कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
ठळक मुद्दे गावकीचा वार्षिक १५ वा कोळी महोत्सव रविवार २४ डिसेंबरलाशोभा यात्रा, कोळी व लोककलेवर आधारीत गीते, नृत्य आणि नाट्य यांचा रंगतदार कार्यक्रमउद्घाटन सोहळा हा ज्येष्ठ नागरिकांच्याच हस्ते - महोत्सवाचे वैशिष्ट्य